

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्याच्या राजकारणासह राज्यातील सद्यस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते.
मंगळवारी मंत्री पंकजा मुंडे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यापूर्वी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली होती. बुधवारी रात्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले. सर्वप्रथम ते प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर अजित पवार प्रफुल पटेल यांच्यासह अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बैठक चालली. या बैठकीचा तपशील बाहेर आला नसला तरी राज्याच्या राजकारणावर चर्चा झाल्याचे समजते. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले त्यामुळे या अनुषंगानेही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.