

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आमच्या पुढेच झाली होती, असा दावा अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत हे अजित पवारांचे स्वप्न होते. आमच्यापुढेच एकत्र येण्याची चर्चा झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थंड बस्त्यात पडल्याचा दावा केला जात असताना सयाजी शिंदे यांनी हे विधान केले आहे, हे विशेष.
सयाजी शिंदे यांनी रविवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, अजित पवारांनी सर्वधर्म समभाव घेऊन, गरीब-श्रीमंत न पाहता, खालून आल्यामुळे सर्वकाही खूप पुढे घेऊन जाण्याचे ठरवले होते. मला असे वाटते की, त्यांचे हे स्वप्न आपण सगळ्यांनी विशेषतः सुनेत्रा वहिनी, सुप्रिया ताई व पवारांनी पुढे न्यायला पाहिजे. दोन्ही गट एकत्र यावेत हे दादांचे पहिले स्वप्न होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे अशी आमची इच्छा आहे. असे झाले तरच महाराष्ट्राची ताकद वाढेल, असे ते म्हणाले.