

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखातील मजकुरावर खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी आक्षेप घेतला. भाजपसोबत जाण्याची दादांची वारंवार स्पष्ट भूमिका होती, हे देखील त्यांनी सांगितले. विलीनीकरणासंदर्भात शरद पवार गटाकडून प्रस्ताव आल्यावर त्यावर सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शशिकांत शिंदे यांच्या लेखाबद्दल बोलताना ते म्हणाले की, अजितदादांच्या निधनानंतर अशा लिखाणाचा हेतू काय? शशिकांत शिंदे यांनी असे लिखाण पुन्हा केले तर योग्य उत्तर देणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. लेखाचे शीर्षक हे 'भावपूर्ण निरोप अजित दादांना' असे आहे, याचा अर्थ दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा लिहिलेला हा लेख आहे, असे ते म्हणाले. विलीनीकरण झाल्यावर अजित दादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते, हे सगळ्यांना मान्य आहे. यात नवीन काही नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्ताव आल्यास विलीनीकरणावर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर शरद पवार गटाकडून प्रस्ताव मांडला जाईल, तेव्हा सुनेत्रा वहिनी आणि पक्षाचे नेते यावर चर्चा करतील, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत पक्ष निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका
सुनील तटकरे म्हणाले की, भाजपसोबत राहावे अशी दादांची वारंवार भूमिका होती. २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये देखील भाजपसोबत राहण्याचे त्यांचे मत होते. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत राहावे यासाठी दादांनी वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेतली होती, असे त्यांनी सांगितले.
हिरामण खोसकर यांच्याशी चर्चा करणार
हिरामण खोसकर यांनी विलीनीकरणासंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. २०१९ मध्ये त्यांना दादांनी उमेदवारी दिली. ते चांगले आमदार आहेत. त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. त्यांच्यासोबत एकत्रित बसून चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणार असल्याचे ते म्हणाले.
'ती' ताकद पक्षाला मिळत राहणार, पंतप्रधानाचे आश्वासन
अजित दादा असताना जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत होती. तीच ताकद पक्षाला मिळत राहील असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत दिले असल्याचे ते म्हणाले.