

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा गुन्हा दाखल न झाल्यावरून पवार कुटुंबीयांमध्ये वार-पलटवार सुरू झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनाचे राजकारण करू नका, अशी समज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्यावरून रोहित पवार यांनी काकासाठी पुतण्या लढतोय, असा पलटवार केला आहे.
रील स्टार संतोष पंडित यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल झाला, पण माझा भाऊ अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गुन्हा दाखल होत नाही. सत्तेत असलेले या पक्षाचे नेतेसुद्धा याबाबत गप्प असल्याबाबत शरद पवार राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी जाहीर खंत व्यक्त केली होती.
मी त्याच परिवारात जन्माला
रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्यावरून पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाला धार दिली. सुनेत्रा पवार यांनी केलेले विधान आपल्याबद्दल नव्हते, असे स्पष्ट करतानाच मी त्याच परिवारात जन्माला आलो आहे. मीदेखील पवार आहे. माझे काका अपघातात मरण पावले आहेत आणि पुतण्या काकासाठी लढतोय, अशा शब्दांत रोहित यांनी भूमिका मांडली.
अजित पवार यांचा अपघात झाला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. स्वतःला अजित पवार यांचे मित्र म्हणवणारे लोक त्यांना न्याय मिळावा यासाठी लढत नाहीत, असे रोहित पवार म्हणाले.
आमची मागणी कोणाला अयोग्य वाटत असेल तर ते त्यांना लखलाभ. मला जे वाटले ते मी बोलतो, करतो आणि पुढेही तेच करणार, असा थेट इशाराही त्यांनी दिला. तसेच सुप्रियाताईसुद्धा योग्यच बोलल्या ना, अशा शब्दांत रोहित यांनी पाठराखण केली.
काकडे-पवार भेटीवरही टोला
काकडे-पवार भेटीबाबत विचारले असता रोहित पवार यांनी उपरोधिक टिप्पणी केली. त्यांना कन्स्ट्रक्शन सोडून वेगळं काही कळतं का. अशा लोकांसमोर शरद पवार राजकारणाशी संबंधित चर्चा करणार का?. काकडे यांच्याकडे राजकीय परिपक्वता आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला.