

मुंबई ः अहमदाबाद येथे 12 जून रोजी दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानात कोणताही यांत्रिक दोष नव्हता. तसेच, विमानाच्या देखभाल-दुरुस्तीसंबंधी कोणत्या त्रुटी आढळल्या नाहीत. विमान अपघात तपास संस्थेने (एएआयबी) दिलेल्या अहवालात तसा उल्लेख नसल्याचा दावा एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कॅम्पबेल विल्सन यांनी केला आहे.
आपल्या कर्मचार्यांना पाठवलेल्या अंतर्गत ई-मेलमध्ये विल्सन यांनी ‘एएआयबी’च्या अहवालाचा हवाला देत विमान सुस्थितीत असल्याचे सांगितले आहे. अपघाताच्या अंतरिम अहवालात अपघाताचे कारण दिले नसून, सुरक्षेसंबंधीची शिफारसदेखील केलेली नाही. याशिवाय इंधन नमुन्यांच्या तपासणीतही कोणतीही संशयास्पद बाब समोर आली नाही. इंधनाची गुणवत्ताही योग्य होती. विमान उड्डाणापूर्वी वैमानिकांची ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून श्वास चाचणी केली. त्यातही काही वावगे आढळले नसल्याचे विल्सन यांनी स्पष्ट केले.
तपास अजून संपलेला नाही. त्यामुळे कोणी लगेचच कोणतेही निष्कर्ष काढू नयेत. आम्ही तपास यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य करत आहोत. कंपनीच्या ताफ्यातील बोईंग विमानांची तपासणी करण्यात आली असून, ती सर्व उड्डाणास योग्य असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे विल्सन यांनी स्पष्ट गेले. अहमदाबाद येथे 12 जून रोजी एअर इंडियाच्या बोईंग 787-8 या विमानाचा अपघात झाला होता. विमान वैद्यकीय संस्थेच्या वसतिगृहावर कोसळल्याने यात प्रवाशांसह 270 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
विमानात 54,200 किलो इंधन होते. उड्डाणावेळी एकूण विमानाचे वजन 2 लाख 13 हजार 401 किलो होते.
विमानाने दुपारी 1 वाजून 8 मिनिटे आणि 39 सेकंदांनी उड्डाण केले. इंजिनाला इंधन पुरवठा नियंत्रित करणारे स्विच एका सेकंदाच्या अंतराने बंद केले गेले.
1 वाजून 9 मिनिटे 5 सेकंदांनी वैमानिकाने ‘मेडे’चा संदेश पाठवला. नंतर, विमानाचा संपर्क तुटला.
ड्रोनच्या साहाय्याने विमानाचे अवशेष शोधून गोळा केले.
विमानाची दोन्ही इंजिने सुरक्षित ठिकाणी ठेवली आहेत.
‘डीजीसीए’च्या प्रयोगशाळेत बोअर्स आणि टँकमधून घेतलेल्या इंधनाच्या नमुन्यांची चाचणी समाधानकारक आली.