

मुंबई : मुंबईसह राज्यभरात भाजपला घवघवीत यश मिळत असतानाच दुसरीकडे केवळ नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत मर्यादित असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने राज्यभरात विजयी घोडदौड केली. मुंबईसह राज्यभरात एमआयएमचे ९५ उमेदवार जिंकून आले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये २४, मालेगावमध्ये २० विजयी उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसची व्होटबॅंक समजला जाणारा मुस्लिम वर्ग एमआयएमकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूकीच्या निकालात भाजप हा मोठा पक्ष ठरला असला तरी राज्यात एमआयएमने मोठी कामगिरी केली आहे. २९ महापालिकांपैकी छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, नांदेड येथे पक्षाने चांगली कामगिरी केली असून ९५ ठिकाणी त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमिवर तेथे एमआयएमने २४ जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ मालेगावमध्ये २०, सोलापूर, धुळे, नांदेड येथे प्रत्येकी आठ याप्रमाणे २४ उमेदवार या तीन महापालिकांमध्ये विजयी झाले आहेत. तसेच अमरावती ६, ठाण्यात ५, नागपूरात ४ जागांवर विजय मिळवला आहे. चंद्रपूरमध्ये देखील एमआयएमने विजयाचे खाते खोलले आहे. या विजयामुळे मुस्लिम बहुल भागात ओवेसी यांची जादु चालल्याचे दिसत आहे.