मुंबई ः पवन होन्याळकर
राज्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षातील बीई/बीटेक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेतील यंदा सर्वाधिक जागा असलेल्या टॉप 20 अभ्यासक्रमांची यादी समोर आली असून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डेटा सायन्स, आयटीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित शाखांमध्ये जागांची मोठी वाढ झाली आहे. परिणामी, यंदाच्या प्रवेशात याच टॉप जागांच्या कोर्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक राहणार असल्याचे संकेत सीईटी सेलकडून देण्यात आले आहेत.
राज्यभरातील अभियांत्रिकीच्या 400हून अधिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदा तब्बल 2 लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर त्यापैकी 2 लाखावर विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरली आहेत. या विद्यार्थ्यांची पहिली यादी 31 जुलैला जाहीर होणार आहे. प्रवेशासाठी यंदा बीई/बीटेक अभ्यासक्रमासाठी तब्बल 18 हजार 871 नवीन जागांची भर पडली आहे.
गतवर्षी (2024-25) मध्ये कॅप फेरीसाठी 1 लाख 57 हजार 224 जागा होत्या, त्या आता वाढून 1 लाख 76 हजारावर 95 वर पोहोचल्या आहेत. यंदा तब्बल 2 लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर त्यापैकी 2 लाखांवर विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरली आहेत. या विद्यार्थ्यांची पहिली यादी 31 जुलैला जाहीर होणार आहे.
या वर्षीच्या टॉप प्राधान्यक्रमांची यादी पाहता विद्यार्थ्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, एआय अँड डेटा सायन्स, एआय अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, आयओटी अँड ब्लॉकचेन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अशा विविध उपशाखांवर अधिक भर दिल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, बायोटेक्नॉलॉजी, एरोनॉटिकल, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स यांसारख्या पारंपरिक शाखाही काही प्रमाणात यादीत स्थान टिकवून आहेत. बदलत्या औद्योगिक गरजांमुळे, डिजिटल कौशल्ये व क्लाउड, डेटा, एआय यांसारख्या नव्या तंत्रज्ञानातील कुशलतेस प्राधान्य दिले जात असल्याची माहिती महाविद्यालयांकडून देण्यात आली.
शालेय स्तरापासून डिजिटल शिक्षण वाढत असल्यामुळे, कम्प्युटर आणि एआय क्षेत्रातील शाखांना सर्वाधिक प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे ‘एआय अॅण्ड मशीन लर्निंग‘, एआय अॅण्ड डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, आयओटी, डेटा सायन्स या शाखांची एकूण संख्याच हजारोमध्ये गेली आहे. या क्षेत्रांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल या शाखांकडे वाढतो आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक अभ्यासक्रमांमध्ये 1 ते 3 हजार जागांची वाढ झाली आहे. केवळ कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्येच यंदा 27 हजार 927 जागा उपलब्ध असून त्या मागील वर्षाच्या 25 हजार 920 जागांपेक्षा जवळपास 2 हजारांनी अधिक आहेत. त्याचप्रमाणे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सीएसई), एआय अँड डेटा सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) या शाखांनाही मोठ्या प्रमाणावर पसंती मिळेल, असा अंदाज आहे.
विशेष म्हणजे यंदा काही नवीन अभ्यासक्रमांचाही समावेश झाला असून ‘मेकॅनिकल अँड रेल इंजिनीयरिंग’, ‘सिव्हिल इंजिनीयरिंग विथ कम्प्युटर अॅप्लिकेशन’, ‘प्रिंटिंग अँड पॅकेजिंग तंत्रज्ञान’, ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (बायो-मेडिकल)’ अशा नव्या शाखाही यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्यांदाच दिसून येणार आहेत.
या वर्षी सर्वाधिक जागावाढ झालेल्या शाखांमध्ये कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग आघाडीवर असून, मागील वर्षीच्या 14 हजार 385 जागा यंदा 17 हजार 370 वर पोहोचल्या आहेत, म्हणजेच तब्बल 2 हजार 985 जागांची वाढ झाली आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेतील जागा 12 हजार 991 वरून 15 हजार 106 झाल्या असून, 2 हजार 115 जागांची वाढ झाली आहे.
मेकॅनिकल अॅण्ड रेल इंजिनिअरिंग (60 जागा) सिव्हिल इंजिनिअरिंग विथ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (30), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रीजनल लँग्वेज (60) इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन (बायो मेडिकल) 30 प्रिंटिंग अॅण्ड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी (60) जागा.
एकूण जागा : 1, 76, 095
अर्जदार विद्यार्थी : 2, 16, 200
पसंतीक्रम भरलेले : 2 लाखाहून अधिक
पहिली गुणवत्ता यादी : 31 जुलै