ST Employees Strike : एस.टी. कर्मचार्‍यांचा संप मागे; मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ

वाढ पूर्वलक्षी प्रभावाने; मुख्यमंत्री शिंदेंसोबतची बैठक यशस्वी
ST employees union Strike back
दोन दिवसांच्या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई | ST Employees Strike : राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील एस.टी. कर्मचार्‍यांनी मंगळवारपासून संपाचे हत्यार उपसले होते. बुधवारी (दि. 4) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या संपावर तोडगा निघाला. एस.टी. कर्मचार्‍यांना मूळ वेतनात वाढ करण्याच्या निर्णयानंतर एस.टी. कर्मचार्‍यांनी आपला संप मागे घेतला आहे. एप्रिल 2020 पासून कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यासह पगारात सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करण्याच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचारी संपावर गेले. या संपावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह एस.टी. कर्मचार्‍यांच्या 13 संघटनांच्या प्रतिनिधींसोबतच आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत तसेच किरण पावसकर, गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.

जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय घेत संपकर्‍यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले. संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एस.टी. कर्मचार्‍यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल 2020 पासून कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एस.टी.च्या महसूलवाढीसाठी कर्मचार्‍यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानत निर्णयाची माहिती दिली. राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनानुसार एस.टी. कर्मचार्‍यांना वेतन मिळावे किमान त्या पातळीपर्यंत वेतन न्यावे, अशी आमची मागणी होती. यासंदर्भातील सरकारी समितीनेही सरसकट साडेपाच हजारांची वाढ सुचवली होती. त्यानुसार आम्ही पाच हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी मान्य केली आहे.

ज्या कर्मचार्‍यांना नोव्हेंबर 2021 मध्ये पाच हजार रुपयांची वाढ मिळाली त्यांच्या वेतनात आता दीड हजाराची वाढ देण्यात आली आहे; तर ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली. तसेच, ज्या कर्मचार्‍यांच्या वेतनात तेव्हा अडीच हजारांची वाढ करण्यात आली त्यांच्या पगारात आता चार हजार रुपयांची भरघोस वाढ सरकारने केली आहे. मी यानिमित्त महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानतो, असे पडळकर म्हणाले. तसेच, सर्व एस.टी. कर्मचार्‍यांनी गुरुवारी सकाळी सात वाजेपासून कामावर उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

दरम्यान, एस.टी. कर्मचार्‍यांना विशेषतः महिला कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस.टी. डेपोत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी 193 कोटी रुपये एमआयडीसीच्या निधीतून मंजूर करण्याचे आदेश दिल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हा संप मागे घेण्यात यश आल्याने दोघांचेही सामंत यांनीही आभार मानले.

कामावर रुजू होण्याचे एस.टी. कामगार नेत्यांचे आवाहन

एस.टी. कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले; तर एस.टी. महामंडळाला आर्थिक फटका बसला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला असून, कर्मचार्‍यांना वेतनवाढ जाहीर करण्यात आली. त्यामुळे कर्मचार्‍यांनी सेवेत रुजू व्हावे, असे आवाहन नेत्यांनी कामगारांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news