

मुंबई : पदाचा गैरवापर करून कर्तव्यात हलगर्जीपणा करणे आणि कार्यालयात उपस्थित न राहणे आदी गोष्टींना जबाबदार धरत एसटी महामंडळ प्रशासनाने राज्यातील 34 आगार प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा आगारप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागविला जाणार आहे. त्यांचा खुलासा समाधानकारक वाटला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक रस्ते बंद असून पुलावर पाणी वाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीची वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली आहे. अनेक प्रवासी बसस्थानकावर अडकून पडले आहेत. मात्र, मुख्यालयात हजर राहून आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडण्याऐवजी महामंडळाच्या 251 पैकी 34 आगारातील आगारप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे.
खुलासा मागविण्याचे निर्देश
बेजबाबदार आगारप्रमुखांना संबंधित प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस तातडीने बजावण्याचे आदेश देत संबंधितांकडून तातडीने खुलासा मागविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.