

मुंबई : परिवहन विभागाची परवानगी न घेता सेवा सुरू केल्याबद्दल ‘रॅपिडो’ या अॅप आधारीत सेवेवर कारवाई झाली असतानाच कंपनीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांच्या प्रो-गोविंदा लीग स्पर्धेला प्रायोजकत्व दिले. त्यामुळे विरोधकांनी याविषयी ‘प्रेशर टॅक्टिक’चा संशय व्यक्त करत मंत्र्यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश यांचा दावा आहे की, हे प्रायोजकत्व कारवाईपूर्वीच निश्चित झाले होते. कारवाईचा आणि स्पॉन्सरशिपचा काही संबंध नाही.
2 जुलैला विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्य शासनाने कोणत्याही बाईक अॅपला अद्यापी अधिकृत परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले होते. अवैधरित्या अॅपद्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणार्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तर रंगेहात पकडले. त्यानंतर शासनाने नुकतेच ई-बाईक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले होते.
असे असताना प्रो गोविंदा सीझन 3 स्पर्धेच्या वरळी येथील एनएससीआय डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये उद्घाटनापूर्वी आणि उद्घाटनादरम्यान या कार्यक्रमात रॅपिडो हे मुख्य प्रयोजक म्हणून असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले. त्यामुळे विरोधकांसह सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या. यावरून विरोधी पक्षातील आमदारांनी हा मुद्दा हाती घेऊन थेट परिवहनमंत्र्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अधिवेशनात ज्या कंपनीविरोधात स्टिंग ऑपरेशन होते, तीच रॅपिडो कंपनी प्रताप सरनाईकांच्या इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप देते, याला मराठी भाषेत खंडणी असे म्हणतात, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.
‘चुकीचे काम केले तर कारवाई नक्की’
या आरोपासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या 3 वर्षांपासून ही कंपनी या कार्यक्रमासाठी स्पॉन्सर आहे. स्पॉन्सरशिप दिली म्हणून त्यांनी शासनाला विकत घेतले का? चुकीचे काम केले तर शासन त्यांच्यावर नक्की कारवाई करेलच. खेळामध्ये राजकारण कोणीही आणता कामा नये. मी परिवहन मंत्री नसताना देखील ही कंपनी आणि अशा काही कंपन्या स्पॉन्सर आहेतच, असे सरनाईक म्हणाले.