

मुंबई ः महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra cabinet) अखेर रविवारी पार पडल्यानंतर आता खातेवाटपाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हे खातेवाटप येत्या दोन-तीन दिवसांत पार पडेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. महत्त्वाच्या खातेवाटपासाठी रस्सीखेच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खलबते सुरू आहेत.
या मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट मंत्री असल्यामुळे खातेवाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे. खातेवाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अधिकारातील विषय आहे. तेच यासंदर्भात निर्णय घेणार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले असले तरी महत्त्वाच्या खात्यांसाठी त्यांचीही मोर्चेबांधणी सुरू आहे. अजित पवारांना वित्त खाते देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. अजित पवार जर वित्तमंत्री झाले तर ते शिवसेना आमदारांच्या फायली अडवतील, अशी भीती शिवसेना आमदारांना वाटते. मात्र, अजित पवारांना वित्त खाते मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह, नगरविकास या खात्यांवर दावा केला होता. मात्र, गृहखाते देण्यास फडणवीस यांचा विरोध पाहता भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांच्याकडे गृह खाते राहील यावर शिक्कामोर्तब केले आहे. शिंदेंचा गृहनंतर दुसरा पर्याय नगरविकास खाते हा होता. मात्र, हे खाते देण्यासही भाजपचा विरोध आहे. हे खाते स्वतःकडे ठेवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे नगरविकास खाते कोणाकडे जाते याबाबत कमालीची उत्सुकता आहे.?
अंशत: बदल करून आधीच्या सरकारमध्ये असलेली बहुतांश खाती महायुतीच्या तीन घटक पक्षांकडे रहाणार आहेत. भाजपकडे गृह, ऊर्जा, महसूल, गृहनिर्माण, ग्रामविकास, उच्च व तंत्रशिक्षण, सार्वजनिक बांधकाम आदी महत्वाची खाती राहू शकतात. शिवसेनला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) सामाजिक न्याय, उद्योग, उत्पादन शुल्क, रोजगार हमी, परिवहन, शिक्षण, पर्यटन, पाणी पुरवठा व स्वच्छता अशी खाती मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडे वित्त, सहकार व पणन, महिला व बालविकास, सहकार, क्रीडा, मदत व पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा, कृषी, वैद्यकीय शिक्षण अशी काही खाती राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सध्या विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून, त्या द़ृष्टीनेही खातेवाटपाचा विषय शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठकांना वेग आला आहे. तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते यासंदर्भात आपसात चर्चा करून खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करतील, असे सूत्रांनी सांगितले.