पुढारी ऑनलाईन डेस्क : गँगस्टर अबू सालेम (Abu Salem) याचा मुक्काम नशिकच्या कारागृहातच असेल. सालेम याने त्याच्या स्थानंतराविरोधात दाखल केलेली याचिका स्वतःच मागे घेतलेली आहे. सालेम यापूर्वी तळोजा मध्यवर्ती कारागृहात होता, पण कारागृहातील काही दुरुस्तीसाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे.
कारागृह बदलले जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिक सालेम याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका त्याने स्वतःच मागे घेतली. त्यानंतर १ ऑगस्टला न्यायमूर्ती भारती डंग्रे आणि मंजुषा देशपांडे यांनी ही याचिका रद्द केली, असे बार अँड बेचने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
सालेम (Abu Salem) मुंबईतील १९९३च्या बाँबस्फोटातील मुख्य दोषी आहे. तो तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सालेमला तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तुरुंग प्रशासनाने सालेम याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवण्याचा निर्णय घेतला होता. याला सालेम याने विरोध केला होता, आणि तशी याचिका दाखल केली होती.
नाशिकमधील कारागृहात आपल्या जीवाला प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून धोका आहे, आणि आपले कारागृह बदलणे हा एक कट आहे, असे सालेमने म्हटले होते. तळोजात आपल्यावर दोन वेळा हल्ला झाला आहे, हेही त्याने याचिकेत म्हटले होते.
सालेम (Abu Salem) याने आधी सेशन कोर्टात दाद मागितली. सेशन कोर्टाने मागणी सालेमची याचिका फेटाळली पण तुरुंग प्रशासनाला सालेमला ३ जुलैपर्यंत तळोजा कारागृहात ठेवावे, असे आदेश दिले. त्यानंतर सालेम याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर ४ जुलैला सालेम याला नाशिक कारागृहात हलवण्यात आले.
तळोजा कारागृह प्रशासनाचे मत असे होते की तळोजा येथील ज्या सेलमध्ये सालेमला ठेवले आहे, त्याला कडेकोट सुरक्षा देण्यात आलेली आहे. पण या सेलची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे आणि या एकाच कारणाने सालेमचा तुरुंग बदलला जात आहे.