

मुंबई : आरेतील आदिवासींनी कष्टाने लावलेल्या आणि मुलांप्रमाणे जपलेल्या सुमारे ८० फळझाडांना आरे वन विभागाने अनधिकृत ठरवले आहे. यासाठी काही आदिवासींना नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे येथील आदिवासी बांधव संतप्त आहेत. आमचे आरे आम्ही कधीच सोडणार नाही, असा एल्गार त्यांनी केला आहे.
आरे आदिवासी हक्क संवर्धन समिती आणि श्रमिक मुक्ती संघाने गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात माध्यमांशी बोलताना त्यांचा हा संताप व्यक्त केला. यावेळी अध्यक्ष दिनेश हवाले, लक्ष्मण दळवी, आकाश भोईर, प्रमिला भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. आरेत नवीन झोपड्या वाढत आहेत. त्यामुळे आमचे मूळ आदिवासी पाडे उद्ध्वस्त होत असल्याची खंत व्यक्त करीत, आमच्या वडीलधाऱ्यांनी, आम्ही लावलेली झाडे अनधिकृत घोषित करून ती तोडून टाकली जातात. मात्र, इतर हौशी लोकांनी त्याच जमिनीत झाडे लावली तर कशी चालतात ? असा सवालही समितीने यावेळी केला आहे. अदानींच्या प्रोजेक्टसाठी वॉर्ड समितीकडून वनहक्क समितीवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप समितीचे सचिव आकाश भोईर यांनी यावेळी केला आहे.
२७ पाड्यांमध्ये शेताच्या बांधावर अळू, केळी पेरू, चिकू, आंब्या-फणसाची रोपे अशी जवळपास ८० फळझाडे आदिवासींनी लावली आहेत. येत्या ३ ऑगस्टपर्यंत ही झाडे काढून टाकावीत, असे नोटिसीत म्हटले आहे. या सर्व नोटिसा तत्काळ रद्द कराव्यात, विकास आराखड्यात आदिवासी पाड्यांची नोंद घ्यावी, मूळ आदिवासी पाडे गावठाण घोषित करावे, अशा मागण्याही समितीने यावेळी केल्या आहेत.
आमच्या पिढ्यान्पिढ्या आरेत गेल्या. आम्ही तुरुंगवास भोगल्यानंतर आरेचे जंगल जाहीर झाले आहे. आता वनविभाग सांगतो, तुम्ही आमच्या जागेत आला आहात. जंगलाशिवाय आम्ही राहू शकत नाही. आम्ही शेतकरी आहोत. नुसते घरे घेऊन काय करणार? आमचे लोक पुनर्वसन इमारतींमध्ये मरत आहेत. आमचे आरे आम्ही कधीच सोडणार नाही, असा एल्गार महिला कार्यकर्त्या प्रमिला भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.