

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनासाठी गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी 'आम्ही असू अभिजात, दिल्ली रंगवू, देश दंगवू, 'मराठी' रंगात' हे संमेलन गीत लिहिले होते. हे गीत राज्याचे अभिजात मराठी राज्यगीत होण्याची शक्यता आहे. याबद्दलचा प्रस्ताव मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना देण्यात आला असून, त्यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते.
केंद्र सरकारने गेल्यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यामध्ये 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' सुरू आहे. या सप्ताहादरम्यान 'आम्ही असू अभिजात' या गीताला अभिजात मराठी राज्य गीताचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. या गीताला राज्याचे अधिकृत अभिजात मराठी राज्यगीत म्हणून मान्यता द्यावी, असा प्रस्ताव मंत्री सामंत यांच्याकडे सादर करण्यात आला.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून या गीताचे छायाचित्रीकरण करण्यात आले होते. दिल्लीतील साहित्य संमेलनातून 'आम्ही असू अभिजात' हे गीत सर्वांपर्यंत पोहोचले. हे एक सर्वसमावेशक आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे गीत असल्याचे मान्यवरांनी गौरवले आहे. म्हणून या गीताला राज्याचे अभिजात मराठी गीत म्हणून मान्यता मिळावी, असा विचार समोर आल्याने प्रस्ताव सादर केला केल्याचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांनी आमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या गीताचे संक्षिप्त रूप सादर करण्यास त्यांनी सांगितले होते. तो सादर करण्यात आला असून त्यालाही मान्यता मिळाली आहे. सध्या अभिजात मराठी भाषा सप्ताह सुरू आहे. त्यादरम्यान, 'आम्ही असू अभिजात' ला अभिजात मराठी राज्यगीताचा दर्जा मिळेल, याचा विश्वास वाटतो.
डॉ. अमोल देवळेकर, गीतकार
नामवंत गायकांचा सुरेल साज
'आम्ही असू अभिजात' हे गीत संगीतकार आनंदी विकास यांनी ते संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, हरिहरन, गायिका प्रियांका बर्वे यांच्यासह मंगेश बोरगावकर, सागर जाधव, शमिमा अख्तार या गायकांच्या सुरेल आवाजाचा या गीताला साज चढला आहे.