मुंबई : अधिकृत उमेदवारांच्या विरोधात महायुतीच्या मित्रपक्षाकडून झालेली बंडखोरी शमविण्यासाठी रात्रभर खलबते झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यात एकमेकांच्या विरोधातील उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी नीती ठरवून सुमारे 25 जागांचा आढावा घेण्यात आला. तिन्ही पक्षांचे नेते मिळून बंडखोरांची समजूत काढणार असून एक-दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचे परिणामही दिसतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आदी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी महायुतीतील नेत्यांच्या बैठकीची माहिती दिली. अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज भरणे आणि त्यांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आमचे सर्व अपेक्षित अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर 4 तारखेपासून जोरात प्रचाराला सुरुवात होईल. मात्र काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात अर्ज भरले गेले आहेत. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आणि आमचे सर्व विषय मार्गी लागले आहेत. आता एकमेकांविरोधातील उमेदवार मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज-उद्या त्याचे प्रत्यंतर सर्वांना येईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
काही जागांवर पक्षांतर्गत बंडखोरी झाली आहे. ही बंडखोरी शमविण्यासाठी आम्ही एक नीती तयार केली आहे. पक्षांतर्गत बंडखोरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अर्ज परत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिन्ही पक्षांतील बंडखोरांसाठी हेच सूत्र अवलंबण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्रिपदासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतले. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, त्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानतो. मात्र महायुतीचे सरकार येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार यात शंका नाही. माहिम मतदारसंघात अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना आमदार सदा सरवणकर हे निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. यावर तोडगा काढला जाईल. मार्ग असा निघावा की ज्यातून आम्ही सर्व एकत्र राहू, असेही फडणवीस म्हणाले.
सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी करण्याच्या फायलीवर दिवंगत आर. आर. पाटील यांची सही होती, या अजित पवारांच्या दाव्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना ती फाईल दाखवून गोपनीयतचा भंग केल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. त्यावर ती गोपनीय फाईल नव्हती. माहिती अधिकारात कोणीही ती फाईल मागवू शकतो, असा खुलासा फडणवीसांनी केला. मुख्य म्हणजे आर. आर. पाटील आता हयात नसल्याने त्यावर बोलणे प्रशस्त वाटत नाही, असे ते म्हणाले.