

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक २० वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली होती. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सर्जिकल ब्लेड आणि खडे सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील रहिवासी असलेली एक २० वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री उशिरा गोरेगाव येथील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. ती त्या दिवशी आधी ट्रेनने मुंबईला गेली होती, असे तिने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी केलेल्या तपासात, एका ऑटो रिक्षा चालकाने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला तिथेच सोडून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ऑटो रिक्षा चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे ब्लेड आणि दगडांसह काही वस्तू जबरदस्तीने घुसवल्याचे आढळून आले आहे. डॉक्टरांनी त्या वस्तू बाहेर काढल्या असून पीडितेवर उपचार सुरु आहेत.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता नालासोपारा परिसरातील राहणारी आहे. तर तिच्यावर वसईतील ऑटो रिक्षाचालकाने तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर ड्रायव्हरने तिला परत मुंबईत आणले आणि नंतर तिला जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यानच्या राम मंदिर स्टेशन परिसरात सोडून देत तो तिथून निघून गेला. मुंबई पोलिसांच्या झोन १२ च्या डीसीपी स्मिता पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. तर संशयित आरोपी ऑटो रिक्षा चालक राज रतन वालवाल याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मात्र, या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेने आधी दावा केला की ती एक अनाथ आहे. जिचे संगोपन वाराणसीतील एका काकानी केले. तिने सांगितले की ती २० जानेवारीला काकासोबत विमानाने मुंबईत आली होती. पण नंतरच्या एका अकाउंटमध्ये तिचे आई-वडील जिवंत असून ती नालासोपारा येथे राहत असल्याचे उघड झाले.
पोलिसांना महिलेच्या घरच्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर तिने सांगितले की तिचे वडील एक फळ विक्रेते आहेत आणि आई घरकाम करणारी असून ती परिसरात छोटे- मोठे काम करते. त्यानंतर त्या महिलेने सांगितले तिचे वडील रागीट स्वभावाचे आहेत. त्यांनी अनेकदा तिला आणि तिच्या आईला मारहाण केली. ते तिच्या भावंडांसोबत वारंवार भांडण करायचे.
२१ जानेवारी रोजी वडिलांशी झालेल्या भांडणानंतर ती घरातून निघून गेली. घरच्यांना कामावर जात असल्याचे सांगून ती निघून गेली होती. त्यानंतर ती नालासोपारा स्टेशनला गेली. जिथे तिची एका ऑटो चालकाशी भेट झाली. सदर महिलेने सांगितले की तिने तिच्या घरच्या समस्यांबद्दल आणि आत्महत्येच्या विचारांबद्दल त्याला सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ऑटो रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे आणि पीडीत महिलेवर वांद्रा येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.