PM मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एक फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जात असताना दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात, असा इशारा फोनवरुन देण्यात आला. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी इतर यंत्रणांना सतर्क करत तपास सुरू केला आहे, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी हे अमेरिका दौऱ्यावर जात असल्याने त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात, असा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी आला होता. मात्र याच नंबरहून मुंबई नियंत्रण कक्षाला विविध धमक्यांबाबतचे फोन आल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे मुंबई नियंत्रण कक्षला फोन करणारी ती व्यक्ती माथेफिरू असून पोलिस तरीही सतर्क राहून प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे आढळून आले आहे.
पीएम मोदी (Narendra Modi) सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. पॅरीसमध्ये ते एआय शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर त्यांचा २ दिवसांचा अमेरिका दौरा आहे.

