मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ४ बालकांचा ‘सेप्टिक शॉक’ने मृत्यू | पुढारी

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ४ बालकांचा ‘सेप्टिक शॉक’ने मृत्यू

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप येथील सावित्रीबाई जोतिबा फुले प्रसूतिगृहात गेल्या चार दिवसांत चार बालकांचा अतिदक्षता कक्षात सेप्टिक शॉकमुळे मृत्यू झाला, तर तीन बालके गंभीर स्थितीत आहेत. हा प्रकार उघडकीस येताच प्रचंड खळबळ उडाली असून, विधानसभेत पडसाद उमटताच महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

या चार मृत्यू झालेल्या बालकांपैकी एक बाळ गोरेगावला राहणार्‍या प्रमोद मोरे यांचे होते. १४ तारखेला ओमेशरी मुकुंदे यांची मुलगी, सारिका बच्छाव यांचे मूल 12 तारखेला, नेहा मोरे यांचे मूल 15 तारखेला, तर सालीहा नारकर यांचे मूल अतिदक्षता विभागात दाखल केले होते. या सर्व बाळांचा 20 ते 23 डिसेंबरदरम्यान मृत्यू झाले.

विधानसभेत पडसाद

सेप्टिक शॉकमुळे चार बालकांच्या मृत्यूप्रकरणी विधानसभेत विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे बालकांचे मृत्यू झाले आहेत. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह संबंधित अधिकार्‍यांना निलंबित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील बालकांचे रोज मृत्यू होत असताना महापालिकेने लक्ष घातले नाही. बालकांचा दिवसाढवळ्या खून केला आहे, असे फडणवीस म्हणाले. शेवटी मुख्य आरोग्य अधिकार्‍याचे निलंबन नगरविकास मंत्र्यांना जाहीर करावे लागले.

राजुल पटेल विरुद्ध पालक

मृत्युमुखी पडलेल्या बाळांच्या आई-वडिलांनी व कुटुंबीयांनी रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करीत याप्रकरणी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. पालिकेच्या आरोग्य विभाग समितीच्या अध्यक्षा रजुल पटेल यांनी रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेत करण्यात सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी या ठिय्या आंदोलन करणार्‍या पालकांची भेट घेतली.

बाळांच्या मृत्यूंची जबाबदारी पालिकेने स्वीकारावी, अशी मागणी पालकांनी करताच राजुल पटेल भडकल्या आणि त्यांची पालकांशी शाब्दिक चकमक झडली. जबाबदारी कसली? मुलांना या रुग्णालयात दाखल करताना आम्हाला विचारले होते का, असा वादग्रस्त सवाल पटेल यांनी या दु:खीकष्टी पालकांना विचारला. त्यामुळे पालक आणखी भडकले. स्थानिक नगरसेवक उमेश माने यांनी मध्यस्थी करीत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बोला, मला काही फरक पडत नाही, असे सुनावून पटेल तेथून तडक निघून गेल्या. या पालकांनी राजुल पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सेप्टिक शॉक म्हणजे काय?

सेप्टिक शॉकमुळे हे मृत्यू झाले असावेत. सेप्टिक शॉक म्हणजे जंतुसंसर्ग झाल्यानंतर बाळाचा रक्तदाब कमी होतो. प्लेटलेट्सचे प्रमाणही घटते, हृदयाची स्पंदने वाढतात आणि श्वास वाढतो. बाळाला हगवण लागते, उलट्या होतात, थंडी वाजते व त्वचा निस्तेज पडत जाते. ही अवस्था जीवघेणी समजली जाते. नवजात बालकांना अशा संसर्गाचा धोका अधिक असतो.

Back to top button