वाहनांचा धूर अन् रस्त्यांची धूळ मुंबईच्या प्रदूषणाचे मुख्य कारण | पुढारी

वाहनांचा धूर अन् रस्त्यांची धूळ मुंबईच्या प्रदूषणाचे मुख्य कारण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वाहनांमधून निघणारा धूर (उत्सर्जन) आणि रस्त्यांवरील धूळ मुंबईतील प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय जर्नलच्या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

वाहनांचे उत्सर्जन आणि रस्त्यांवरील धुळीसह औद्योगिक उत्सर्जन, ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे तसेच महापालिकेकडून जाळला जाणारा घनकचरा हे विषारी पीएम टेनसाठी (प्रदूषणातील आरोग्यासाठी घातक कण) प्रमुख प्रदूषक आहेत.

वाहनांमधून निघणार्‍या धुरामुळे 49 टक्के पीएम टेन कण निर्माण होतात. महाराष्ट्राच्या मोटार वाहन विभागाच्या (आरटीओ) माहितीनुसार, गेल्या 15 वर्षांहून अधिक काळात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वाहनांच्या संख्येत 35 टक्क्यांनी वाढ झाली.

मार्च 2020पर्यंत केलेल्या नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या 38 लाख (3.8 दशलक्ष) इतकी आहे. 20 वर्षांपूर्वी हाच आकडा एक दशलक्ष इतका होता. एकूण वाहनांमध्ये दुचाकी वाहने निम्म्याहून अधिक (54 टक्के) आहेत. त्यानंतर चारचाकींचा (34 टक्के) नंबर लागतो. संपूर्ण राज्यातील एकूण वाहनांच्या संख्येपैकी 10.3 टक्के वाहने केवळ मुंबईत आहे.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईसारख्या मेट्रो शहरांना वायू प्रदूषणाचा सर्वाधिक धोका आहे. 2019 ते 2020 या कालावधीत मुंबईत सीएनजी वाहनांमध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाल्याचे महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे. मुंबईतील एकूण वाहनांपैकी 35 टक्के वाहने ही 15 वर्षांपेक्षा जुनी असून त्यांच्यातून पीएम टेन कर्ण उत्सर्जनाचे प्रमाण 49 टक्के इतके आहे.

देवनार डंपिंग ग्राउंड तसेच बोरिवली-पश्चिम आणि मुलुंड-पूर्व येथील कचरा डेपोत जाळला जाणारा कचराही पीएम टेन कण वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. याशिवाय, मुंबईत जवळपास प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर टोलेजंग इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. येथील डेब्रिज तसेच बांधकामासाठी होत असलेल्या अव्याहत वाहतुकीमुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे.

डेव्हलपमेंट ऑफ एमिशन इन्व्हेंटरी फॉर एअर क्वालिटी असेसमेंट अँड मिटिगेशन स्ट्रॅटेजीज
ओव्हर मोस्ट पॉप्युलस इंडियन मेगासिटी, मुंबई हा पेपर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमॅनिटी अँड नेचर, क्योटोमधील (जपान) शास्त्रज्ञ पूनम मंगराज आणि पर्यावरण विभागातील सरोज कुमार साहू यांनी लिहिला आहे.

बीकेसी रोड, अमर महाल जंक्शन, गोरेगाव पुलावर सर्वाधिक प्रदूषण वांद्रे-कुर्ला (बीकेसी) रोड, आर. एल. केळकर रोड, आर. बी. मेहता मार्ग, 60 फूट रोड, नेहरू रोड, नेहरू रोड, अमर महाल जंक्शन, एल. एस. चौहान मार्ग, विक्रोळी रोड, गोरेगाव ब्रीज, एनएससी बोस रोड, पी. एल. लोखंडे मार्ग या ठिकाणी सर्वाधिक वायू प्रदूषणाची नोंद होते.

पीएम टेन कण हे इतके सूक्ष्म असतात की, ते वायूसारखे प्रभावी कार्य करतात. श्वास घेताना फुप्फुसात खोलवर जातात. पीएम टेनच्या उच्च प्रभावाच्या संपर्कात आल्यास खोकला येण्यापासून ते उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका किंवा अकाली मृत्यू येऊ शकतो.

प्रदूषणात कुणाचा वाटा किती? (एकूण %)

वाहतूक 19.6
उडणारी धूळ 19.4
उद्योग 18.9
पालिकेचे कचरा दहन 13.8
बांधकामे 6.3
झोपडपट्ट्या 5.2
घरगुती 3.7
ऊर्जा प्रकल्प 3.7
उदबत्त्या/मच्छर 3.3
अगरबत्त्या व सिगारेट्स

Back to top button