शिंदे, राष्ट्रवादी, मनसेलाही बदलावे लागले प्रचारगीत | पुढारी

शिंदे, राष्ट्रवादी, मनसेलाही बदलावे लागले प्रचारगीत

मुंबई : गौरीशंकर घाळे : शिवसेना ठाकरे गटाने आपल्या प्रचारगीतातून ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू धर्म’ हे शब्द हटविण्यास नकार देत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मात्र, यापूर्वी निवडणूक आयोगाने असाच आक्षेप शिवसेना (शिंदे गट), अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहिरात तसेच प्रचारसाहित्यातील शब्दांवर घेतला होता. त्यानुसार या तिन्ही पक्षांनी जाहिराती तसेच प्रचारगीतात आयोगाच्या निर्देशानुसार बदल करत त्यास मान्यताही घेतल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. मशाल प्रचारगीतातील ‘हिंदू धर्म’ आणि ‘जय भवानी’ या शब्दांवर आयोगाने आक्षेप घेतला असला तरी हे शब्द हटविणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र, निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी असेच आक्षेप शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारगीतावरही घेतला होता. शिंदे गटाच्या प्रचारगीतातही ‘जय भवानी’ हा घोष वापरण्यात आला होता. सोबतच ‘रामराज्य’ असा उल्लेखही होता. निवडणूक आयोगाने हे दोन्ही शब्द हटविण्याची सूचना केल्यानंतर शिंदे गटाने हे दोन्ही शब्द आपल्या साहित्यातून वगळत नव्याने सुधारित गीत, जाहिरात मान्यतेसाठी आयोगाकडे सादर केले. आयोगाच्या सूचनेनुसार बदल करत सादर केलेल्या जाहिरातींना नंतर नियमानुसार मान्यताही मिळाल्याचे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही आपल्या जाहिरातीत बदल करावा लागला. मौलाना आझाद महामंडळाने केलेल्या कामाच्या प्रसिद्धीसाठी पक्षाकडून जाहिरात बनविण्यात आली. या जाहिरातीत दाखवलेल्या कुटुंबाच्या घरावरील भिंतीवर ‘मक्का-मदिना’ तसेच ‘786’ ही धार्मिक चिन्हे दिसत होती. निवडणूक आयोगाने धार्मिक चिन्हे दर्शविणारा भाग वगळून नव्याने जाहिराती मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या जाहिरातींमध्ये सुधारणा करत त्यांना मान्यताही घेतली. त्यानंतर या जाहिराती प्रसारितही झाल्याचे समजते. तर, अन्य एका जाहिरातीतील आई तुळजाभवानीचा फोटोही हटविण्यात आला होता.

त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडवा मेळाव्याच्या प्रचारासाठी बनिवलेल्या जाहिरातीत ‘जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो’ अशी राज ठाकरेंची साद वापरली होती. त्यातील हिंदू या शब्दावर आयोगाने आक्षेप घेतल्याने मनसेनेही सुधारणा केली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जाहिरातीत धार्मिक चिन्ह, स्थळ, प्रतिकांचा वापर करण्यास मनाई आहे. त्यानुसार प्रमाणीकरणासाठी सादर केलेल्या साहित्यात धार्मिक संदर्भ आल्यास आयोगाकडून त्या हटविण्याच्या सूचना देण्यात येतात. सर्वच राजकीय पक्षांना प्रचार प्रसिद्धीसाठी दिल्या जाणार्‍या जाहिराती, संदेश तसेच प्रचारगीतांचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीही गठीत केली आहे. या समितीने 16 एप्रिलपर्यंत जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांनी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने 54 प्रमाणपत्रे वितरीत केली आहेत.

Back to top button