मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर?; चर्चेने पुन्हा खळबळ | पुढारी

मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर?; चर्चेने पुन्हा खळबळ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर हे शिवसेना शिंदे गटात जाणार आणि त्यांना शिंदे गटात गेल्यानंतर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात येणार असल्याच्या बातम्या रविवारी सकाळपासून काही वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्या. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
मात्र या सर्व फेक न्यूज असल्याचे सांगत असे काहीही घडणार नसल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले, तर मातोश्रीवर रविवारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही.

उद्धव यांचे स्वीय सचिव नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गेली तीस वर्षे ते ठाकरे यांच्यासोबत असतात. शाखाप्रमुख पद मागण्यास गेलेले नार्वेकर नंतर उद्धव यांचे सर्वात निकटवर्तीय बनले. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी नार्वेकर यांना लक्ष्य केले होते. गटप्रमुख, शाखा प्रमुखापासून ते सर्व आमदार, खासदार, नेते यांच्यापर्यंत नार्वेकरांचे नेटवर्क आहे. गोपनीय बैठका, घडामोडींमध्ये सहभाग असल्याने त्यांचे इतर पक्षातील प्रमुखांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत संबंध आहेत.

सध्या महायुतीसाठी दक्षिण मुंबई हा मतदारसंघ अडचणीचा ठरला आहे. येथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सलग दोन वेळा खासदार झाले आहेत. यावेळीही त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपला दक्षिण मुंबई मतदारसंघ हवा आहे. पक्षाने येथे मंत्री मंगलप्रभात लोढा व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तयारीला लागण्याची सूचना केली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. नार्वेकर यांना फोडल्यास ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना तो धक्का असेल. त्यांचे आणखी काही पदाधिकारीही गळाला लागू शकतात, असा शिंदे गटाचा होरा आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आ.संजय शिरसाट यांनी नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांना सोडून पक्षात आल्यास त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया दिली.

Back to top button