मुंबई : पुढारी वृत्तसेवा : देशातील प्रमुख आयटी कंपन्यांचे मार्चअखेरचे प्रगती पुस्तक जाहीर झाले. त्यात बहुतांश कंपन्यांनी नफा कमावला आहे. मात्र, तीन प्रमुख आयटी कंपन्यांतील मनुष्यबळ 2023-24 च्या आर्थिक वर्षात 63,759 ने कमी झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या कॅलेंडर वर्षात आयटी कंपनींना दीर्घकालीन नवे करार करण्यात अपयश आले. तसेच, मंदी सदृश्य वातावरणाचाही सामना करावा लागला. भारतातील आयटी कंपन्यांची मदार अमेरिकेवर अधिक आहे.
अमेरिका आर्थिक गती राखण्यासाठी कसरत करत आहे. त्यामुळे तेथील ग्राहकांना खर्च करण्यात हात आखडता घेतला आहे. त्याचा परिणाम भारतीय आयटी उद्योगावर झाल्याचे सांगण्यात येते.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) मार्च अखेरच्या तिमाहीत 12,434 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यांची कर्मचारी संख्या आर्थिक वर्षात 13,249ने घटून 6 लाख 1 हजार 546वर आली आहे. जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत कर्मचारी संख्येत 1,759ने घट झाली आहे. इन्फोसिसने मार्चअखेरच्या तिमाहीत 7,975 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. त्यांची कर्मचारी संख्या 25,994 ने घटून 3 लाख 17 हजार 240 झाली आहे.
सलग पाचव्या तिमाहीत इन्फोसिसची कर्मचारी संख्या घटली आहे. विप्रोचा नफा आठ टक्क्यांनी घटून 3 हजार 74 कोटी रुपयांवर आला आहे. हेल्थकेअर व्यवसायात घट झाल्याने त्यांच्या एकूण उलाढालीवर परिणाम झाला आहे. त्यांची कर्मचारी संख्या 24,516 ने घटून 2 लाख 34 हजार 54वर आली आहे.