उद्धव ठाकरेंना वेड लागलेय, मला लागलेले नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर | पुढारी

उद्धव ठाकरेंना वेड लागलेय, मला लागलेले नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंच्या दाव्याचा कडक शब्दांत समाचार घेतला. माझे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीमध्ये जाईन. त्यांना वेड लागलं असेल. पण मला तर वेड लागलेलं नाही, असा हल्ला त्यांनी ठाकरेंवर चढविला.
यातून एक गोष्ट निश्चित झाली. मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री, असा आपल्या परिवाराचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नेते फक्त स्वतःच्या मुलांचा आणि कुटुंबाचा विचार करणारे आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

आदित्यला निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता मुख्यमंत्रिपदासाठी तयार करण्याचा नव्हे; तर आदित्य ठाकरे यांना भविष्यात पक्षाचे नेतृत्व करायचे असल्याने निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता, हे फडणवीस यांनी मान्य केले.

कालपर्यंत यांना भ्रम होता की, अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना कुठल्या तरी खोलीत नेऊन त्यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एक काहीतरी ठरवावे. अमित शहा यांनी शब्द दिला की देवेंद्र फडणवीसने शब्द दिला? उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेले असून खुर्ची गेल्यानंतर त्यांना काहीही समजत नाही. आज मी जाहीर करतो की, आदित्य ठाकरेंना निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला होता. पुढे जाऊन आदित्यकडे पक्ष सोपवायचा आहे, त्यामुळे त्याला काहीतरी प्रशिक्षण मिळाले पाहिजे. पण त्याला मुख्यमंत्री तर सोडा, पण मंत्री बनवायचाही माझा विचार नव्हता, असेही फडणवीस म्हणाले.

Back to top button