सातारा लोकसभेत माथाडींची भूमिका निर्णायक; दोन लाखांवर मते ठरवणार नवा खासदार

सातारा
सातारा

नवी मुंबई: राजेंद्र पाटील : सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी माथाडी कामगारांची सातारा जिल्ह्यातील मते निर्णायक ठरू शकतात.

शशिंकात शिंदे माथाडी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. नवी मुंबईतील सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि नेरुळ मध्ये सुमारे 40 हजार माथाडी कामगार आपल्या कुटुंबियांसह राहतात. यातील बहुतेक सर्व माथाडी कामगारांची मते सातारा जिल्ह्यात आहेत. ही सुमारे दोन लाखांवर मते आहेत.

2019 मध्ये याच माथाडी कामगारांनी नरेंद्र पाटील यांच्यासाठी सातार्‍याच्या मैदानात काम केले होते. आता हेच माथाडी कामगार शिंदेंसाठी मैदानात पुन्हा एकदा ताकदीने उतरणार असल्याचे माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी स्पष्ट केले. दरम्यान, माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील संघटनेच्या कार्याध्यक्षाच्या मागे उभे राहतात की महायुतीच्या उमेदवारासाठी मतांचा जोगावा मागणार याकडे माथाडी कामगारांचे लक्ष लागून आहे.

सातारा लोकसभेत वाई, जावळी, कोरेगाव, पाटण, कराड उत्तर आणि कराड दक्षिण या मतदार संघाचा समावेश आहे. जावळी, कोरेगाव, वाई, खटाव- माण, महाबळेश्वर याभागात मोठ्या प्रमाणावर माथाडी कामगारांची मूळ घरे आहेत. हे कामगार मुंबई, रायगड आणि नवी मुंबईत काम करतात. याच माथाडी कामगारांच्या जोरावर 2019 साली संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर उदयनराजें विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी 4 लाख 52 हजार मते मिळवली होती. आता शशिकांत शिंदे यांना महाविकास आघाडीच्या शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे मतदान यांच्या जोडीलाच माथाडी कुटुंबांचे मतदान, शिंदेच्या हक्काचे मतदान याचा विचार केल्यास सातार्‍यातील लढत तोडीसतोड होईल, अशी शक्यता वतर्वण्यात येत आहे.

माथाडी संघटना 2019 साली नरेंद्र पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभी होती. आता तीच संघटना तेच माथाडी कामगार शशिकांत शिंदेच्याही पाठीशी उभे राहणार, मैदानात उतरणार यात शंका नाही. याबाबत चर्चेचा विषयच येत नाही, असे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी सांगितले.

नवी मुंबईत राहणार्‍या एका माथाडी कामगारांच्या मागे कुंटुंबातील किमान चार ते पाच मतदार आहेत. या मतदारांच्या बळावर उमेदवार आपण विजयश्री खेचून आणून शकतो असे माथाडी कामगार सांगतात. हे मतदान कुणाच्या पारड्यात पडणार, माथाडी संघटना कुणासाठी काम करणार, प्रचारसाठी माथाडी कामगारांच्या टोळ्या सातार्‍यात दाखल होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या दीड वर्षात माथाडी संघटना तीन पक्षात म्हणजे नरेंद्र पाटील ( भाजप), शशिकांत शिंदे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), ॠषिकेश शिंदे ( बाळासाहेबांची शिवसेना) अशी विभागली गेली. मात्र या संघटनेत शिंदेंचे वजन आजही कायम आहे.

नवी मुंबई ः माथाडी सरचिटणीस म्हणून संघटनेच्या वतीने नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा निकालापर्यंत कायम राहतील की नरेंद्र पाटील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतील ? हा उत्सुकतेचा विषय आहे.

माथाडी टोळी प्रमुखांमार्फत होणार शिंदेंचा प्रचार

माथाडी कामगारांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडून शिंदे सातार्‍याकडे रवाना झाले. हेच टोळी प्रमुख राजकीय पक्षांच्या बुथ प्रमुखांची भूमिका चोख निभावणार आहेत. त्यावर गोदी, लोखंड बाजार, एपीएमसी, रेल्वे धक्क्यावरील माथाडी संघटनेचे पदाधिकारी सातारा जिल्ह्यातील नातेवाईकांना फोनाफोनी करुन शिंदेंसाठी मतांचा जोगवा मागणार आहेत.तिकीट जाहीर झाल्यानंतर शिंदे सातार्‍याकडे रवाना झाले असले तरी पदधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंबई एपीएमसीपासून भेटीगाठी सुरु केल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news