दक्षिण-मध्य’ मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने काँग्रेस नाराज; स्वतःच बोलावलेल्या बैठकीला वर्षा गायकवाड यांची दांडी | पुढारी

दक्षिण-मध्य’ मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने काँग्रेस नाराज; स्वतःच बोलावलेल्या बैठकीला वर्षा गायकवाड यांची दांडी

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा ;  दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड नाराज असल्याचे वृत्त आहे. निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाची बुधवारी बैठक बोलावून त्यांनी स्वतःच या बैठकीकडे पाठ फिरविल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.

मंगळवारी जागावाटप जाहीर झाल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी मुंबई काँग्रेसमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारीही पोहोचले. मात्र गायकवाड स्वतःच या बैठकीकडे फिरकल्या नाहीत. त्या उद्या उद्धव ठाकरे यांना भेटून जागा अदलाबदलीची मागणी करू शकतात, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

पक्षाचे कार्यकर्ते व काही नेते जागा वाटपामुळे नाराज आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी बैठक बोलावण्यात यावी असा त्यांचा आग्रह होता. पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाविरोधात अशी जाहीर नाराजी व्यक्त करणे उचित होणार नाही, अशी गायकवाड यांची भूमिका आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींना आपली नाराजी कळविली आहे, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. बैठकीसाठी आलेले नेते व कार्यकर्ते यांच्याशी पक्ष कार्यालयात उपस्थित समन्वयक व इतरांनी चर्चा केली.

महाविकास आघाडीतील जागावाटप मंगळवारी जाहीर करण्यात आले. त्यानंतर दक्षिण मध्य शिवसेनेलाच गेल्याचे स्पष्ट झाले.

महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या काही बैठकांना गायकवाड या मुंबई अध्यक्ष या नात्याने उपस्थित होत्या. त्यांना दक्षिण मध्य या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढायची होती. त्यासाठी त्यांनी पक्ष पातळीवर बराच प्रयत्न केला. मात्र त्यानंतर वाटाघाटीतून त्यांना वगळण्यात आले.

पक्ष कार्यालयात गैरहजर

दक्षिण मध्य हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार हे स्पष्ट झाल्याने गेल्या दोन आठवड्यापासून त्या नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबईत असूनही त्या गेल्या 10/12 दिवसांपासून मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाकडे फिरकल्या नाहीत. ऐन निवडणुकीत पक्ष कार्यालयातील त्यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा रंगली आहे. पक्षातर्फे आयोजित इफ्तार पार्टीच्या दिवशी त्या पक्ष कार्यालयात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्याही दिवशी त्या थेट इफ्तार पार्टीसाठी इस्लाम जिमखान्यात पोहोचल्या.

Back to top button