धनुष्यबाण चिन्हाच्या प्रस्तावावरून बारगळली मनसेची महायुती

धनुष्यबाण
धनुष्यबाण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार नाराज होतील आणि त्याचे परिणाम मुंबईसह उत्तर प्रदेशातही भोगावे लागतील या भीतीने राज ठाकरे यांना थेट सोबत घेणे टाळत त्यांना त्यांचे इंजिन तूर्त यार्डात पाठवून शिंदे सेनेचे धनुष्यबाण हाती घेण्याचा प्रस्ताव महायुतीकडून देण्यात आला होता. हा प्रस्ताव राज यांनी अमान्य करत बिनशर्त पाठिंबा देऊन सत्ताधार्‍यांचा रोष टाळल्याची चर्चा आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना स्वत: राज ठाकरे यांनीच हा चिन्हाचा विषय छेडला. मी माझे पक्षचिन्ह कष्टाने कमावलेले आहे. त्यामुळेच इंजिन सोडण्यास आपण नकार दिल्याचे राज यांनी स्पष्ट सांगितले. या मेळाव्याच्या दुसर्‍याच दिवशी या चिन्हप्रस्तावासंदर्भात शिंदे शिवसेना आणि भाजपकडूनही खुलासे आले. भाजपने राज यांना कमळ चिन्हाचा प्रस्ताव दिला नव्हता, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. आम्ही कधीही अशी भूमिका मांडली नाही. तेही असा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत. कारण ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. अशा मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना कमळावर लढा असे सांगण्याचे आमच्यावर संस्कार नाहीत. आम्ही त्यांच्यासमोर असा प्रस्ताव कधीही मांडणार नाहीत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या या खुलाशाने मग शिंदे सेनेलाच धनुष्यबाणाचा प्रस्ताव दिल्याची कबुली द्यावी लागली. शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले की, शिवसेनेकडून राज ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या प्रस्ताव दिला होता. मात्र, राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले की मी माझे चिन्ह हे कमवलेले आहे. त्यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरे यांनी आमचा प्रस्ताव मान्य केला असता तर मनसेसाठी दक्षिण मुंबईची जागा निश्चित होती.

ताजमध्ये शेवटच्या वाटाघाटी

गेल्या 19 मार्चला राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मनसेला दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा देण्यावर चर्चा झाली होती. मात्र मनसेला सोबत घेतले तर उत्तर भारतीय मतदारा नाराज होतील त्याचा फटका मुंबई ठाणे जिल्ह्यासह उत्तर प्रदेशमध्येही बसेल अशी चर्चा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झाली. परिणामी, राज ठाकरे यांच्या स्वतःच्या चिन्हावर उमेदवार न देता त्यांना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्यास सांगावे, अशी रणनीती ठरविण्यात आली. त्यानंतर मुंबईत राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्हाचा पर्याय देण्यात आल्याने बोलणी फिस्कटल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news