महायुतीचे जागावाटप अजून ठरेना; ठाणे, पालघर, संभाजीनगरवर भाजपाचा दावा कायम | पुढारी

महायुतीचे जागावाटप अजून ठरेना; ठाणे, पालघर, संभाजीनगरवर भाजपाचा दावा कायम

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपले जागावाटप जाहीर केले असताना महायुतीचे जागावाटप मात्र अजूनही जाहीर झालेले नाही. हे जागावाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर या शिवसेनेकडे असलेल्या जागांवर भाजपाने, तर नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा कायम ठेवल्याने जागावाटप लांबले आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित यांच्यात चर्चा सुरू आहे.

महायुतीने 48 पैकी आतापर्यंत 39 जागा जाहीर केल्या आहेत. भाजपाने 24, शिवसेनेने 10, राष्ट्रवादीने 4, तर रासपने 1 जागा जाहीर केली आहे. महायुतीच्या ज्या 9 जागा जाहीर करणे बाकी आहे त्यात उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असून त्याबाबत महायुतीत कोणतेही दुमत नाही. भाजप खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी दुसर्‍या सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे, तर सातारा भाजपकडे, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ शिवसेनेकडे राहणार आहे.

उर्वरित छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक, पालघर, दक्षिण मुंबई, रत्नागिरी – सिंधुदुर्ग या सहा जागांवर वाटाघाटी सुरू आहेत. विशेषतः हे सर्व सहा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. यातील नाशिकवर राष्ट्रवादी काँग्रेसने, तर अन्य मतदारसंघावर भाजपाने आपला दावा कायम ठेवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा वाटप लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. महाविकास आघाडीचे ठरल्याने आता माहितीच्या जागावाटपही येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारचा मुहूर्त काढला जाण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी 10 जागा जाहीर केल्या आहेत. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाला 13 ते 14 जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सहापैकी दोन ते तीन जागांवर त्यांना पाणी सोडावे लागणार आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपला सोडण्याचे जवळपास निश्चित झाले आहे, तर ठाणे, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावरचा दावा भाजपा सोडायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर जागावाटप रखडले आहे.

Back to top button