राज ठाकरेंची निवडणूकीपूर्वी शिवाजी पार्कवर सभा; ‘हे’ आहेत भाषणातील महत्त्वाचे मुद्दे | पुढारी

राज ठाकरेंची निवडणूकीपूर्वी शिवाजी पार्कवर सभा; 'हे' आहेत भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Raj Thackeray Speech : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईच्या शिवाजी पार्कवर सभा पार पडली. गुढीपाडवा मेळाव्यातील या सभेत ठाकरेंनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. दरम्यान त्यांनी महायुतीला पाठिंबा देत असल्याची देखील घोषणा केली आहे. ठाकरेंनी सत्ताधारी वर्गाने कोणत्या बाबींवर लक्ष द्यायला हवं लक्ष केंद्रित केले आहे.

मनेस्चाय आजच्या सभेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत सोबत जाईल अशा चर्चा होत्या.  राज ठाकरेंनी याबाबत आज महत्त्वाची घोषणा केली. या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे खाली दिली आहेत.

अमित शहांच्या भेटीनंतर अनेक तर्क-वितर्क

अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, माझी भूमिका मी योग्यवेळी मांडेन. मग उगीच पाळत ठेवल्यासारखी माध्यमं का वागतात ? माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, आणि करावीच लागेल. मी आडपडदा ठेवून, आत एक बाहेर एक असं करणारा नेता नाही.

मी शिंदेंच्या सेनेत जाणार अशा चर्चा होत्या मात्र…

मी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशा चर्चा सर्वात जास्त रंगल्या होत्या. या चर्चा का केल्या जात होत्या मला माहित नाही. काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार… “अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. ते सर्व बाजूला सारून मी महाराष्ट्र दौरा केला आणि माझा पक्ष उभा केला. कारण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही.”

मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही

मी एकच सांगतो की, मी फक्त बाळासाहेब ठाकरेंचा शिलेदार आहे. माझा स्वत:चा पक्ष आहे. मी त्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. मला माझं चिन्ह सर्वात जास्त प्रिय आहे. तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका… मी जे अपत्य जन्माला घातलं आहे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ तेच मी वाढवणार, त्याचं संगोपन करणार… मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत. त्यावर मी ठाम आहे असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

रेल्वे इंजिन’ हे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह

माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा पेरल्या… ‘रेल्वे इंजिन’ हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. माझ्या पक्षाच्या चिन्हावर कोणतीही तडजोड करणार नाही. कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका.

 चर्चांमध्ये या भूमिका समजून घ्यायला हव्यात

मी अमित शहांना भेटल्यानंतर… २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. २०१४ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान होण्याआधी, २०१९ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान झाल्यानंतर… ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी एक गोष्ट स्पष्टच सांगतो… एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो… आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो.

राज्यकारभारातील त्रुटींवर मी सडकून टीका केल्या आहेत

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांच्या राज्यकारभारात ज्या त्रुटी आढळल्या त्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्यावरही सडकून टीका केली. पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदनाचा ट्विटही सर्वप्राथच मीच केलं… ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात.

काहीजणांना राजकीय इतिहासाचं माहित नसतो

ठाकरे कधी दिल्लीत गेले नाहीत. काहीजणांना राजकीय इतिहासाचं माहित नसतो… स्व. बाळासाहेब १९८० साली दिल्लीत संजय गांधी आणि इंदिरा गांधी ह्यांना भेटायला गेले होते. नेत्यांना भेटणं, चर्चा करणं… ह्यात वावगं काय ? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

माझा काँग्रेसशी जास्त काही संबंध नाही

माझा काँग्रेसशी जास्त काही संबंध आला नाही. भेट होत असायच्या मात्र भाजप सोबत गाठी पडल्या. अनेक नेत्यांना भेटलो. मी गुजरातला गेल्यानंतर पीएम नरेंद्र मोदींना भेटलो. त्यावेळी गुजरातहून आल्यानंतर मला काहींनी प्रश्न विचारला होता की गुजरात कसा आहे. तर मी एकच उत्तर दिले होते की, गुजरातमध्ये विकास आहे मात्र महाराष्ट्र खूप पुढे आहे. मोदींनी पंतप्रधान करावं यासाठी पहिलं मत मांडणारा राज ठाकरे एकमेव नेता महाराष्ट्रातून होता. असं ठाकरे यावेळी म्हणाले. माझं महाराष्ट्रावर सर्वात जास्त प्रेम आहे. आणि महाराष्ट्राच्या विरोधात बोलणारे मला खपणार नाही असंही ठाकरे म्हणाले.

भाजपच्या ज्या गोष्टी मला पटल्या त्यासाठी मी काम केलं

मला वाटलं होतं की भाजपचं सरकार आल्यानंतर खूप काही बदल होईल. मात्र सध्या काय काय सुरु आहे हे चित्र सगळ्यांच्या समोर आहे. पण जे चुकीचं आहे त्याला मी विरोध करतो. गेल्या पाच वर्षात खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. ज्या गोष्टी मला पटल्या त्यासाठी मी काम केलं आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासारख्या टीका मी करत नाही

आज उद्धव ठाकरे, संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. मग उद्धव ठाकरे , संजय राऊतांना इतक्याच मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात. तेव्हा सत्तेचा मलिदा खात राहिलात अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

देशात उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या

आज जगात सर्वाधिक तरुण देश भारत आहे. या तरुणांना उद्योगांची गरज आहे, रोजगाराची आहेत सोई सुविधांची गरज आहे. माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या… तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. भारतातील तरुणांकडे लक्ष द्या. हेच भारताचं भविष्य आहे. प्रत्येक देशाचा एक काळ येत असतो.

राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका

आज निवडणुकीच्या जागावाटपाची जी हाणामारी सुरु आहे ती पाहता विधानसभेला सर्व पक्ष कोथळाच काढतील एकमेकांचा. ह्यासाठी निवडणुका असतात का? मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे कि, “राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल.”

मनसे महायुतीला पाठींबा देत आहे

माझ्या सरकारकडे असलेल्या मागण्या स्पष्ट आहेत. सरकारने विकासासाठी काम करावे. तरुणांकडे लक्ष द्यावे. उद्योगांसाठी लक्ष द्यावे. या गोष्टी पीएम मोदी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि महायुतीला मनसे पाठींबा देईल असे जाहीर करतो. असे म्हणत ठाकरेंनी मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला.

विधानसभेच्या तयारीला लागा : मनसैनिकांना आवाहन

माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. मागे-पुढे पाहू नका आणि तुम्ही विधानसभेच्या जोरदार तयारीला लागा.

मला महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे

माझा माझ्या सहकाऱ्यांवर, त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. सर्वसामान्य घरातून येणाऱ्या ह्याच सहकाऱ्यांना घेऊन मला महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे.

आम्हाला राज्यसभा, लोकसभा नको, फक्त नरेंद्र मोदींसाठी पाठिंबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे… आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

 

हेही वाचा

Back to top button