तळकोकणात भावकीतली कंदाल; नारायण राणे-किरण सामंत यांच्यातील स्पर्धेने महायुतीत ‘शिमगा’ | पुढारी

तळकोकणात भावकीतली कंदाल; नारायण राणे-किरण सामंत यांच्यातील स्पर्धेने महायुतीत ‘शिमगा’

मुंबई : संजय कदम :  भावकीतली कंदाल हे तळकोकणाला काही नवीन नाही. ’सख्खे भाऊ, पक्के वैरी’ ही म्हण कोकणातच उपजली. आता शिवसेना-भाजपची महायुती त्यांना अपवाद राहिलेली नाही. सध्या महायुतीत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांतले वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतले असलेल्या मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या निवडणुकीतून माघार घेत असलेल्या मंगळवारी मध्यरात्रीच्या ट्विटने आणि त्यानंतर सकाळी हे ट्विट हटवल्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

भैय्या सामंत नाराज का?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेली पत्रकार परिषद या सर्वांसाठी कारणीभूत ठरली; नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत यांना टार्गेट केले. राणेंच्या या भूमिकेवरून सामंत समर्थक अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी राणेंविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर आपल्या स्थानिक विविध कमिट्यांच्या पदांचे राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. भैय्या सामंत लोकसभा उमेदवारीसाठी गेले वर्षभरापासून प्रयत्न करीत आहेत. काल-परवा रत्नागिरीत नारायण राणेंनी मेळावा घेतला. सामंत गटाचाही मेळावा झाला. दोघांनी आपली शक्ती आजमवण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे मेळावे उमेदवारीसाठी आहेत हे काही लपून राहिलेले नाही.

दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ

राणे आणि सामंत यांच्यात उमेदवारीवरुन झालेले वितुष्ट विद्यमान खा. विनायक राऊत यांच्या पथ्यावर पडू शकते. तिकीट कोणाला मिळेल हा भाग वेगळा पण भाजपला उमेदवारी मिळाल्यास शिंदे शिवसेना आणि शिवसेनेला उमेदवारी मिळाल्यास भाजपचे कार्यकर्ते नाराज होणार हे नक्की. शेवटी काय भावकीतली कंदाल या निवडणुकीत दिसणार हे उघड सत्य आहे.

मध्यंतरीच्या काळात या मतदारसंघातील माजी खासदार निलेश राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भैय्या सामंत यांना उमेदवारी मिळाल्यास राणे कुटुंबीय त्यांचा किती प्रचार करतील किंवा राणेंना उमेदवारी मिळाल्यास मंत्री रवींद्र चव्हाण त्यांचा किती प्रचार करतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांचा छुपा संघर्ष सर्वश्रुत आहे. यात महत्त्वाची भूमिका ठरू शकते ती मंत्री दीपक केसरकर यांची. आताच विधानसभेला आपल्या मार्गात अडथळा नको म्हणून राणेंसाठी प्रचारात उतरतील अशीही एक अटकळ आहे.

मतदारसंघ शिवसेनेचाच आहे. येथे शिवसेनेचाच खासदार आहे. परंतु ते सध्या ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे ती जागा शिवसेनेचीच आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्गची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी. कार्यकर्ते आणि नेत्यांच्याही त्याच भावना आहेत.
– उदय सामंत, मंत्री

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आमचा दावा असेल. उमेदवार कोण हे आमचा पक्ष ठरवेल. मंगळसूत्र घातले असेल तर युतीचे पावित्र्य राखले पाहिजे.
– नारायण राणे, केंद्रीय मंत्री

Back to top button