ईडीची धाड पडते म्हणून हृदयपरिवर्तन नको! : सरसंघचालक मोहन भागवत | पुढारी

ईडीची धाड पडते म्हणून हृदयपरिवर्तन नको! : सरसंघचालक मोहन भागवत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  समाजात आचरणाचे परिवर्तन हृदयपालटामुळे व्हायला हवे. पोलिस उभा आहे म्हणूनही लोकांच्या आचरणात परिवर्तन होते. ईडीची धाड पडू नये म्हणूनही होते. ते नको आहे, मनापासून झाले पाहिजे. बुद्धीने समजून, विवेकाने व्हायला हवे. असे परिवर्तन घडवायची भूमिका ही प्रत्येक सामाजिक संस्थांची जबाबदारी असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केली.

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या 101 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सामाजिक परिवर्तन – संस्थांची भूमिका या विषयावरील व्याख्यानात भागवतांनी आपले विचार मांडले. आज आपण सर्व गोष्टी आउटसोर्स करतो, ठेका काढतो, जी कामे आपण करायला हवी तिची अपेक्षा ठेका दिलेल्या लोकांकडून करतो. देशाचे काम करायला पण नेत्यांना ठेका देतो आणि अपेक्षा करतो की, त्यांनी सर्व कामे केली पाहिजेत, अशी खंत सरसंघचालकांनी व्यक्त केली.

सामान्य माणसामुळे, समाजामुळेच राजा हा राजा होतो. समाजाने ज्याकरिता कारभार सोपवला, ते राजाने केले नाही, तर त्याला समाज पायउतार करतो. जगभर हे असेच चालत आलेले आहे. जसा समाज असेल, तसा राजा असतो, देश मोठा व्हायचा असेल, तर समाज मोठा झाला पाहिजे. ज्या देशाचा सामान्य माणूस मोठा, तो देश मोठा. म्हणून समाजप्रबोधनाचे खूप महत्व आहे. आणि समाजप्रबोधनात संस्थांची भूमिका महत्वाची असल्याचे भागवत म्हणाले.

नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप माहित नाहीत, अशी खंतही भागवत यांनी व्यक्त केली. सामाजिक परिवर्तनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. अत्यंत भौतिकवादी जीवनशैलीने समाजाचा ताबा घेतला आहे आणि त्यामुळे कौटुंबिक बंधांवर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

उच्च शिक्षण आणि उत्पन्न असलेली कुटुंबे विभक्त आहेत. असे दृश्य कमी कमावणार्‍यांमध्ये दिसत नाही. आमच्या समाजाला आणि आमच्या कुटुंबांना अधिक चांगल्या बंधांची गरज आहे. एखाद्या राष्ट्राचा उदय आणि पतन हे समाजाच्या विचार प्रक्रियेशी आणि मूल्यांशी निगडीत असते. समाजातील आपलेपणा वाढला पाहिजे. समाज, देश,राष्ट्रासाठी मी किती वेळ खर्च करतो, याचा विचार व्हायला हवा, असे सरसंघचालकांनी नमूद केले.

Back to top button