सोन्याची वीट विक्रीचा बहाणा करून व्यावसायिकाला गंडा | पुढारी

सोन्याची वीट विक्रीचा बहाणा करून व्यावसायिकाला गंडा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ; सोन्याच्या विट विक्रीचा बहाणा करुन एका गॅरेज व्यावसायिकाला त्याच्या माजी कर्मचार्‍याने सुमारे 22 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजूअली कुदूसअली, बाबूल बिमल दास आणि राजू या तीन आरोपींविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

यातील तक्रारदाराचे स्वत:चे गॅरेज असून ते सांताक्रुज परिसरात राहतात. त्यांच्याकडे राजू हा काही दिवस काम शिकण्यासाठी आला होता. नंतर तो त्याच्या गावी निघून गेला. काही दिवसांनी त्याने पुन्हा मुंबईत येणार नसून गावीच शेती करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याने शेती करताना अडीच किलोची एक सोन्याची विट सापडली. ही माहिती तो गावी कोणाला सांगू शकत नाही. त्यामुळे सोन्याची ही वीट विक्री करण्यासाठी त्याने त्याला मदत करावी. आपण ती विट स्वस्तात देऊ असे सांगितले. तक्रारदाराला त्याच्या आसामच्या गावी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला मुंबईत बोलावून घेतले. मुंबईत आल्यानंतर त्याच्यासोबत बाबूल आणि राजू असे दोन मित्र होते.

त्यांनी त्यांना काही सोने शहानिशा करण्यासाठी दिले होते. सोनाराने ते सोने खरे असल्याचे सांगितल्यानंतर तक्रारदारांनी अडीच किलोची ती विट 22 लाखांमध्ये घेण्याची तयारी दर्शविली. यावेळी त्यांनी त्यास 21 लाख 80 हजार रुपये दिले व त्यानंतर ती वीट देऊन तिघेही निघून गेले. ही विट त्यांनी कुर्ला येथील ज्वेलर्स व्यापार्‍याला दाखविली. यावेळी या व्यापार्‍याने ते सोने बोगस असल्याचे सांगितले.

या घटनेनंतर त्यांनी राजूला फोन केला असता त्याने त्यांच्याकडे आणखीन 26 लाखांची मागणी केली. राजूकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर राजूसह त्याच्या दोन्ही मित्रांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे.

Back to top button