कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान | पुढारी

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नामवंत लेखक आणि कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आले. ओडिसातील प्रख्यात साहित्यिक प्रतिभा राय यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला.
राजधानी दिल्लीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला साहित्य अकादमीचे  अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष श्रीमती कुसुम शर्मा तसेच सचिव के. श्रीनिवासराव मंचावर उपस्थित होते. देशातील २४ प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप आहे.

कृष्णात खोत यांच्या लेखन कार्याविषयी

मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवतात. कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार कृष्णात खोत’ म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी नावाजले गेले आहे. यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) पुरस्कार, वि. स. खांडेकर पुरस्कार, बाबुराव बागुल शब्द पुरस्कार, भैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

‘रिंगाण’ या कादंबरी विषयी

‘रिंगाण’ या कादंबरीला मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार २०२३ साठी आज कृष्णात खोत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘रिंगाण’ ही एक थक्क करणारी कादंबरी आहे जिच्यात जंगलात राहणाऱ्या समुदायाच्या विस्थापित आयुष्याचे चित्रण आहे आणि या समुदायाला धरण बांधण्याच्या कामासाठी एका प्रतिकूल समुदायामध्ये पुनर्स्थापित करण्यात आलेले आहे. मानव आणि निसर्गातील नातेसंबंधांच्या इतिहासाचे हे निवेदन असून, स्वरक्षणासाठी मानवाने निसर्गाशी केलेल्या संघर्षाचा हा वास्तववादी इतिहास आहे. या कादंबरीतील नायक, देवप्पाचा वेदनादायी शोध मानवाच्या निसर्गाशी असलेल्या नात्यातील दृढता आणि संघर्ष रेखाटतो. मानवाच्या उद्धटपणामुळे आणि ताकदीमुळे कशी पर्यावरणीय आणि सामाजिक हानी झालेली आहे, याचे विवेचन या कादंबरीत करण्यात आलेले आहे.

कोंकणी भाषेतील ‘वर्सल’या लघुकथा संग्रहासाठी प्रकाश एस पर्येंकर यांना पुरस्कार

प्रख्यात कोंकणी लेखक, कवी, अनुवादक तथा पटकथा लेखक, प्रकाश एस पर्येंकर यांना ‘वर्सल’ या लघुकथा संग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

Back to top button