भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेचा घाटकोपर ते राजभवन पायी मोर्चा | पुढारी

भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेचा घाटकोपर ते राजभवन पायी मोर्चा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भिवंडीतील सोळा वर्षीय अल्पवयीन संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईतील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उद्या सोमवारी ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घाटकोपर पूर्व रमाबाई कॉलनी ते मलबार हिल राजभवन असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे .यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात येणार आहे.

१४ फेब्रुवारी रोजी व-हाळदेवी नगर भिवंडी येथून बी. एन. एन. कॉलेजमध्ये इ. ११ वीत शिकणाऱ्या संकेत भोसले या १६ वर्षीय विद्यार्थ्याचे केवळ चालताना धक्का लागला या किरकोळ कारणास्तव दिवसाढवळ्या एका डुगमाफियाच्या गुंड टोळीने अपहरण केले. पाच ते सहा तास त्याला अमानुष मारहाण केली. त्याचे हालहाल करून छळ केला. त्याचे पाय तोडले, असंख्य जखमा केल्या, संकेतचा २१ फेब्रुवारीला के.ई.एम. हॉस्पिटल मुंबई येथे दुःखदायक मृत्यू झाला. विशेष म्हणजे आरोपी डुगमाफिया हा मुख्यमंत्र्यांच्या शिंदे गटाचा भिवंडी शहर उपप्रमुख आहे. या अगोदर शिवा बनसोडे, विकास कांबळे, विकी ढेपे या दलित तरुणांच्या हत्या भिवंडीत हत्या झाल्या आहेत. आतापर्यंत एकाही पिडिताला न्याय मिळालेला नाही. संकेतचे सर्व मारेकरी पकडलेच पाहिजे. संकेतच्या खुनामध्ये सहभागी असलेल्या व आरोपी न केलेल्या मोकाट फिरत असलेल्या गुन्हेगारांना आरोपी केले पाहिजे.

संकेतच्या मारेकऱ्यांना मोक्का लागलाच पाहिजे.

संकेतच्या मारेकऱ्यांवर पोक्सो व आय.टी. अॅक्ट अंतर्गत वाढीव कलमे त्वरीत लावण्यात यावीत संकेतच्या सर्व घटनास्थळांचे सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेज कायदेशीर तरतुदीनुसार जप्त करवेत . भिवंडी ग्रामीण व शहरांमधील सर्व पोलीस स्टेशनला अॅट्रॉस्पिटी प्रतिबंधक कायदया अंतर्गत दाखल झालेल्या गुन्हयातील आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे व आयोगामार्फत सर्व गुन्हयांची चौकशी झालीच पाहिजे.संकेतच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण,५० लाखांची आर्थिक मदत,घरातील एका सदस्याला शासकीय नोकरी, राज्यातील मागासवर्गीय वस्त्यांना संरक्षण तसेच स्वसंरक्षणार्थ शस्त्रांचे परवाने देण्यात यावेत आदी मागण्या मोर्चे कर्यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
सदर मागण्यांसाठी उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता घाटकोपर पूर्व रमाबाई कॉलनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या पायी मोर्चाची सुरुवात करण्यात येणार आहे.या मोर्चात फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व सामाजिक राजकीय संस्था संघटना व मंडळे यांनी तिरंगी झेंडे घेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button