सत्तेच्या हव्यासापोटी अधिकारांचा गैरवापर : विधीमंडळात अनिल परब यांचे भाजपवर आरोप | पुढारी

सत्तेच्या हव्यासापोटी अधिकारांचा गैरवापर : विधीमंडळात अनिल परब यांचे भाजपवर आरोप

खेड; पुढारी वृत्तसेवा : भाजपाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आमदार अनिल परब यांनी आज (दि. २९) विधीमंडळात केला. आपल्या आक्रमक शैलीत पुराव्यानिशी अनिल परब यांनी विधान परिषदेत चांगलेच धारेवर धरले. उद्योजक व प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या बाबत काहीच आक्षेप नव्हता तर मग तब्बल ११ महिने त्यांना जेलमध्ये कशासाठी ठेवले असा सवाल त्यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. सुप्रीम कोर्टात सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी वेळी आमची कोणतीच हरकत नाही असे तपास यंत्रणांनी सांगितले. हरकत नव्हती तर मग ११ महिने आत का ठेवले असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला.

सत्तेच्या हव्यासापोटी अधिकारांचा गैरवापर करत केंद्रीय यंत्रणांचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कशा प्रकारे गैरवापर केला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझे मित्र सदानंद कदम यांच्यावरील कारवाई. आमच्याशी वैर असेल तर ते आम्ही समजू शकतो पण यंत्रणांना हाताशी धरून केला जाणारा सत्तेचा दुरुपयोग थांबवावा असे ठणकावत आमदार अनिल परब यांनी स्पष्ट शब्दात सरकारची कानउघाडणी केली आहे ,

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानपरिषदेमध्ये आमदार अनिल परब यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या चाललेल्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले. . राज्यात मुंबई महानगर पालिकेसह अनेक ठिकाणी विकास निधीच्या नावाखाली चाललेला गैरप्रकार त्यांनी सभागृहात चव्हाट्यावर आणला , ठराविक भागाला हवा तेवढा निधी आणि विरोधी गटातील नगरसेवकाच्या भागात एक रूपयाचाही निधी नाही अशी परिस्थिती सध्या सुरु आहे. विकासनिधीच्या नावाखाली विरोधी गटातील लोकप्रतिनिधी नगरसेवक फोडण्याची कामे केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी आपल्या भाषणात केला. विरोधकांना चेपण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरले जात आहे , राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे , मात्र विरोधकांच्या पाठीशी लागण्याआधी सत्ताधाऱ्यांनी जनतेचा विकास करायला हवा होता , अशा शब्दात त्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावरील नाकाब उतरवला, आपल्या भाषणात आज आमदार अनिल परब यांनी त्यांचे मित्र सदानंद कदम तथा अप्पा यांचा सभागृहात खास उल्लेख केला. सत्तेचा आणि केंद्रीय यंत्रणेचा वापर करुन मित्रपरिवाला धाक दाखवण्याचा सत्तेचा दुरुपयोग हा थांबविला गेला पाहिजे. आमच्याशी शत्रुत्व आहे तर त्याचा आम्ही मुकाबला करू पण त्यासाठी आमच्या मित्रपरिवाराला नाहक जाच का देता असा संतप्त सवालही त्यांनी सरकारला विचारला.

Back to top button