तृतीयपंथीयाला फाशीची शिक्षा; तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण करुन लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण | पुढारी

तृतीयपंथीयाला फाशीची शिक्षा; तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण करुन लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : तीन महिन्यांच्या बाळाला आशिर्वाद देण्यासाठी आलेल्या किन्नराला साडीचोळी आणि पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा बदला घेण्यासाठी बाळाचे अपहरण करून त्याचे लैंगिक शोषण आणि हत्या करणाऱ्या कित्रराला सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधिश आदिती कदम यांनी मंगळवारी आरोपी कन्हैया उर्फ कन्नु दत्ता चौगुले याला फाशीची शिक्षा ठोठावली. सत्र न्यायालयाने किलराला प्रथमच फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

कफ परेड परिसरातील खाडीमध्ये जुलै २०२१ मध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पुरलेल्या स्थितीत आढळला. याच दरम्यान सदर चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास सुरु केला.

तक्रारदाने दिलेल्या माहितीनुसार कन्हैया आणि सोनू हे दोघे किन्नर त्या दिवशी फिरत असताना घरी आले होते. त्यांनी त्या बाळाला आशिर्वाद दिला. त्या बदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे पैसे, नारळ आणि साडीची मागणी केली. मात्र घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांची मागणी पूर्ण करण्यास पालकांनी नकार दिला, त्यातून वाद झाल्यानंतर कन्हैया आणि सोनू निघून गेले. या खटल्याची न्या. आदिती कदम यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने परिस्थीतजन्य पुरावे पाहून सोनू काळेला निर्दोष मुक्त करताना मुख्य आरोपी कन्हैया चौगुलेला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली.

नारळ, साडी, पैसे न दिल्याचा राग

पोलीसांनी चिमुकलीच्या पालकांशी वाद झालेल्या कन्हैया चौगुले (२८) व त्याचा मित्र सोनू काळे (२०) या दोघा तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी नारळ, साडी व पैसे न दिल्याने रागाच्याभरात मध्यरात्री तक्रारदाराच्या घरी गेले. घराचे दार उघडे असल्याचे पाहून तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून हत्या केली आणि मृतदेह कफ परेडच्या खाडीत पुरल्याची कबुली दिली. त्या नंतर दोघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला.

Back to top button