महाराष्ट्र-निवडणूक अधिकारी देशपांडेंची तडकाफडकी बदली | पुढारी

 महाराष्ट्र-निवडणूक अधिकारी देशपांडेंची तडकाफडकी बदली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मुख्यनिवडणूक अधिकारी एस. एम. देशपांडे यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी सनदी अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आहे. एस. चोकलिंगम हे १९९६ च्या तुकडीचे वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

तीनवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असून त्याअंतर्गत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त व मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे तसेच विक्रम कुमार, पी. वेलारसू या सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे निवडणूक अधिकारी देशपांडे यांनाही कळविले होते. त्यानंतर आता मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना या बदलाच्या अंमलबजावणीसाठी पत्राद्वारे कळविले आहे. एस. एम. देशपांडे हे ३० एप्रिलला निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी ही बदली करण्यात आल्याने राज्यातील निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीपासून देशपांडे यांना  बाजूला करण्यात आल्याचे मानले जात आहे.

Back to top button