पुढारी ऑनलाईन डेस्क : सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. आज या अधिवेशनापूर्वी चहापान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील यांनी केलेली वक्तव्ये ही राजकीय आहेत. त्यांच्या आडून कोणतरी तिसरंच बोलत असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यामगे नक्कीच काहीतरी राजकीय हात असल्याचा संशय असल्याने याचा तपास करणार असं सीएम शिंदे म्हणाले.
उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. सरकारने अनेक कामे केली आहेत. शेतकऱ्यांसाठी, स्त्रियांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणलेल्या आहेत. १ रुपयात विमानसेवा सुरु करणारं आपलं पहिलं राज्य आहे. पण तरीही विरोधकांना राजकारणातच जास्त रस असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. आज विरोधकांची मळमळ ही सरकारला घेरण्यासाठी सुरु आहे. चहापानावर बहिष्कार घालण्याची त्यांची परंपरा सुरुच आहे. त्यामुळे विरोधकांनी विश्वास गमावलेला आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
शपथ घेतली होती त्याप्रमाणे सरकारने १० टक्के मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण दिले जाणार आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच सर्व काम सुरु आहे. येवढं होऊनही मराठा आरक्षण टिकणार नाही असं म्हटलं जात आहे. जर तुम्हाला टिकणार नाही असं वाटत आहे तर ते का टिकणार नाही याचं कारणही स्पष्ट करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने निर्णय घेतला असताना आरक्षण टिकवण्याची जबाबदारी देखील आमची आहे. सरकारने जो शब्द दिलेला आहे तो पाळलेला आहे. तरीही आरक्षणाबाबतच्या काही अफवा पसरवल्या जात आहेत. मराठा आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करणारा लवकरच समोर येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे म्हणाले की, आरक्षण मिळणारच नाही असं म्हणून खच्चीकरण केलं जात आहे. मराठा तरुणांनी सावध राहण गरजेचं आहे. जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे काम करत आहेत. पण त्यांच्या आडून कोणतरी तिसरंच बोलत असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यामगे नक्कीच काहीतरी राजकीय हात असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला.
जरांगे पाटील यांच्या मुंबईला रवाना झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याचे प्रमुख दोन वेळा जालन्याला गेले आहेत. काही बोललं तरी खुपतं असं समजू नका. आपण काय बोलतो यांच भान असावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. यदा व सुव्यवस्था ठेवण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे.