Ajit Pawar Group : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मंत्रालयासमोर जल्लोष; निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह निकालानंतर आनंदोत्सव | पुढारी

Ajit Pawar Group : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मंत्रालयासमोर जल्लोष; निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह निकालानंतर आनंदोत्सव

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाकडून आज (दि. ६) मोठा निर्णय देण्यात आला आहे. शरद पवार गटाला मोठा धक्का या निर्णयामुळे बसला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला देण्यात आले आहे. गेले काही दिवसांपासून या निर्णयाची चर्चा होती. आज अखेर हा निर्णय निवडणूक आयोगाकडू जाहीर करण्यात आला आहे. या निकालानंतर अजित पवार गटाच्या सर्व आमदार, खासदारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मंत्रालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाकेबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मंत्रालयासमोरील कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी हातात अजित पवार यांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. एकच वादा अजितदादा, राष्ट्रवादी जिंदाबाज, सुनील तटकरे – प्रफुल पटेल आगे बडो, हम तुम्हारे साथ है या घोषणानी परिसर दणाणून सोडला.

निकालाने आमची जबाबदारी वाढली : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निकालानंतर प्रतिक्रिया : निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्विकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही काल ही कटीबध्द होतो. आजही आहोत आणि भविष्यातही राहू हा विश्वास जनतेला देतो. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आभार व्यक्त करतो.

निवडणूक आयोगाचे आभार : सुनील तटकरे

खासदार सुनील तटकरे यांची निकालानंतर प्रतिक्रिया : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ नाव व ‘घड्याळ’ चिन्ह हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राखून ठेवल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

घड्याळ आणि वेळ दादांचीच : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांची निकालानंतर प्रतिक्रिया : आमचा निर्णय योग्यच होता हे या निकालातून सिद्ध झाले आहे. पक्षातील सर्व मान्यवर नेत्यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन. हा विजय लोकशाहीचा असून घड्याळ आणि वेळ दादांचीच आहे.

Back to top button