

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निर्णयाचे आम्ही स्वागत करत निवडणूक आयोगाचे आभार मानले. पक्षसंघटनेवर आम्ही आता लक्ष देणार असल्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या निर्णयानंतर अजित पवार यांची भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की, 'आम्ही चांगल्या वकीलाच्या सहाय्याने न्यायालयीन लढाई लढू.'
अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबध्द होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज जनतेला दिला. निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्विकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखीन वाढली आहे असेही अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया देतानाच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आभार व्यक्त केले.
तुम्हाला निकाल योग्य वाटला नाही तर याविरोधात न्यायालयात जातात. आम्ही विनम्रपणे निकाल स्विकारला. आम्ही चांगले वकील देऊन आता याविरोधात आमची भूमिका मांडू. ५० पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहे. बहुसंख्य आमदार आमच्याकडेच आहेत. लोकशाहीला प्राधान्य आहे. विधीमंडळाचाही लवकरच निर्णय येईल. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विरोधकांना पक्ष संघटन करण्याची गरज आहे असे पवार यावेळी म्हणाले.