मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी गेलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अदिती चिपकर असे मारहाण झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. ( Maratha Reservation )
संबंधित बातम्या
मुंबई महापालिकेत आरोग्य सेविका या पदावर अदिती चिपकर या काम करतात. गुरूवारी (दि. १ फेब्रुवारी ) रोजी दुपारी वांद्रे पश्चिम येथील एका निवासी इमारतीत त्या सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. तेथे आठव्या मजल्यावर राहणाऱ्या महिला रहिवाशांनी त्यांच्यासोबत वाद घातला. सर्वेक्षणाबाबत माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर सोसायटीतील इतर रहिवाशांनाही सर्वेक्षणाची माहिती देऊ नका, असे सांगितले.
यानंतर त्या आठव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आल्या. सर्वेक्षणासंदर्भात एक प्लॅट मालकाशी बोलत असताना आठव्या मजल्यावरील महिलांनी त्यांच्या मागे येत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना मारहाण देखील केली. एवढेच नव्हे तर त्यांना ओढत खालच्या मजल्यावर जाण्यास सांगण्यात आले. तेथील सुरक्षा रक्षकाला यांना सोसायटीतून बाहेर काढा, अशा सुचना देण्यात आल्या.
हा घडलेला प्रकार त्यांच्या वरिष्ठ डॉ. दीक्षा बॅनर्जी यांना सांगितला. बॅनर्जी लगेच या सोसायटीत दाखल झाल्या. सुरुवातीला महिलांनी त्यांच्याशी शांततेत संवाद साधला. परंतु, त्यानंतर त्यांच्याशीही वाद घातला. यावेळी बॅनर्जी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना एका महिलेने कानाखाली लगावली आणि पायाला लाथा मारल्या. या प्रकारानंतर अदिती चिपकर आणि डॉ. दीक्षा बॅनर्जी यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. ( Maratha Reservation )