Latest
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा दावा : ‘काहीही झाले तरी आमचं सरकार स्थिरच असणार’
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्तेत असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकार कालही स्थिर होते आज आणि उद्यादेखील स्थिर असल्याचा दावा भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. शिवसेना अपात्रता निकाल बुधवारी (दि. १०) अपेक्षित आहे. राज्यात राजकिय पक्षातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. फडणवीस यांच्या प्रबळ आत्मविश्वासामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची दिशा स्पष्ट असल्याचे उघड झाले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, मला एवढीच अपेक्षा आहे की, योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय अध्यक्ष घेतील. आम्ही शिवसेनेसोबत अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार तयार केले आहे. आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे, अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल. यामुळे कुठलाच धोका नाही,सरकार कालही स्थिर होतं आणि उद्याही स्थिर राहील असेही देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

