

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणी २ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता २ फेब्रुवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही संभाव्य तारीख नमूद करण्यात आली आहे.
यापूर्वी शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव या प्रकरणावर १५ डिसेंबरला सुनावणी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सुनावणी नव्या वर्षात २ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेनुसार शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचाही निर्णय १० जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे.
लोकसभा निवडणुका फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीची ही संभाव्य तारीख महत्त्वाची आहे. तत्पुर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचाही निर्णय येणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी १० जानेवारी, २ फेब्रुवारी अशा महत्त्वाच्या तारखा समोर असणार आहेत.