Winter Session Nagpur : दानवेंनी आरोप करताच मंगलप्रभात लोढा यांनी खिशातून काढला राजीनामा | पुढारी

Winter Session Nagpur : दानवेंनी आरोप करताच मंगलप्रभात लोढा यांनी खिशातून काढला राजीनामा

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या बांधकाम कंपनीकडून जमिनींची चुकीच्या पद्धतीने खरेदी, अवैध इमारतींचे बांधकाम आणि फ्लॅटची बेकायदेशीर विक्री केली जात आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या लोढा यांनी आपल्या खिशातून मंत्रीपदाचा राजीनामा बाहेर काढला. आरोप सिद्ध करा, तत्काळ राजीनामा स्वीकारा, असे आव्हान त्यांनी दानवे यांना दिले.Winter Session Nagpur

अंतिम आठवडा प्रस्तावावेळी दानवे म्हणाले की, लोढा यांच्या कंपनीकडून बांधकाम व्यवसायासाठी ठाणे, भिवंडी, कल्याण भागात चुकीच्या पद्धतीने जमिनी खरेदी केल्या जात आहेत. या जमिनींवर अवैधपणे इमारतींचे बांधकाम केले जात असून फ्लॅटची विक्रीसुद्धा बेकायदेशीर केली जात आहे. Winter Session Nagpur

हे आरोप सुरु असताना लोढा सभागृहात नव्हते. त्यामुळे सत्ताधारी बाकावरून आक्षेप घेण्यात आला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही आक्षेप घेतल्यानंतर दानवे यांनी लोढा यांचे नाव मागे घेतले. मात्र, पुन्हा बोलण्यास सुरुवात केल्यानंतर दानवे यांनी लोढा यांचे थेट नाव घेतले नाही. मात्र, मुंबईचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेत्यांकडून हा प्रकार सुरू असल्याचे ते बोलले.

आरोपाचा खुलासा करण्यासाठी लोढा तत्काळ विधान परिषदेत आले. ते म्हणाले, माझे कुटुंबीय अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात आहे. पण त्यांच्या व्यवसायाशी माझा काहीही संबंध नाही. ते सर्वकाही नियमांनुसार व्यवसाय करत आहेत. मी सध्या मंत्री आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाने व्यवसाय करू नये का, असा सवाल लोढा यांनी केला.आजवर आपण एकही बेकायदा काम केलेले नाही. माझे बेकायदा काम दाखविल्यास मी राजीनामा देतो. पुरावे नसताना माझ्यावर आरोप करू नका. मी कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा घेऊन आलो आहे, असे आव्हान लोढा यांनी दिले.

त्यावर दानवे यांनी पलटवार केला. ते म्हणाले, मी विरोधी पक्षनेता आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. आपण पुराव्याशिवाय बोलत नाही. आठ-दहा लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. यापुढे तक्रारदार लोकांना तुमच्याकडे पाठवतो. दानवे यांच्या आव्हानावर लोढा यांच्याकडून प्रतिआव्हान देण्यात आले. तुम्ही तारीख आणि वेळ सांगा. मी पुरावे घेण्यासाठी येतो, असे लोढा म्हणाले.
सभागृहातील वातावरण पाहून डॉ. गोऱ्हे यांनी हस्तक्षेप केला. त्या म्हणाल्या, सध्या अनेकजण राजीनामा खिशात घेऊन फिरतात. लोढा यांनी स्वतःचा राजीनामा खिशातून बाहेर काढला आहे. पण, त्यांनी राजीमाना देण्याची गरज नाही. दानवे यांनी येथे आरोप न करता त्यांनी पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा लोकायुक्तांसारख्या मंचाकडे तक्रार करावी, त्या-त्या संस्था आरोपांची चौकशी करतील, अशी गोऱ्हे यांनी सूचना केली.

हेही वाचा 

Back to top button