‘धारावीच्या नागरिकांनी मातोश्रीवर मोर्चा नेला तर मी…’ मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला | पुढारी

'धारावीच्या नागरिकांनी मातोश्रीवर मोर्चा नेला तर मी...' मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आज (दि. ६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्या धारावी पुनर्विकास योजनेच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका केली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. धारावीच्या लोकांची परिस्थिती बिकट आणि दयनीय आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. त्यामुळे जर धारावीतील नागरिकांनी मातोश्रीवर मोर्चा नेला तर मी आश्चर्य करणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.

सीएम शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे विकासविरोधी आहेत. राज्यातील मोठे प्रकल्प बंद पाडण्याचे काम, राज्याला मागे नेण्याचे काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीने केले. नाणार येथील अणुऊर्जा प्रकल्प, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि आरे मेट्रो कारशेड प्रकल्प बंद पाडण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे असे आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

उद्धव ठाकरेंच्या अदानी कार्यालयावरील मोर्चावर बोलताना शिंदे म्हणाले, विकास करणाऱ्या उद्योजकांचा विरोध ठाकरे सतत करतात. सर्वांना माहीत आहे की देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाच्या निवासस्थानाजवळ ज्या अधिकाऱ्याने स्फोटके सोडली, त्याला सेवेत कुणी घेतले असा सवाल शिंदेंनी केला

धारावीच्या परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, धारावीच्या लोकांची परिस्थिती बिकट आणि दयनीय आहे. मागील 25 वर्षे धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रयत्नांना अपयश मिळाले. उद्धव ठाकरे हे गरीबविरोधी आहेत असा आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले, धारावीत राहणाऱ्या गोरगरिबांना हक्काची घरे मिळू नयेत हाच उद्धव ठाकरेंचा प्रयत्न राहिलेला आहे. पुढे ते म्हणाले, “मला आश्चर्य वाटणार नाही की धारावीचे लोक मातोश्रीवर उलटा मोर्चा नेतील. आज विदेशी पर्यटक धारावीची झोपडपट्टी बघायला येतात, भविष्यात ते धारावीचा विकास पाहायला येतील. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा

Back to top button