अकोल्यात घडलेली घटना अमानवी, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकरांची संतप्त प्रतिक्रिया | पुढारी

अकोल्यात घडलेली घटना अमानवी, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकरांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अकोल्यात घडलेली घटना अमानवी, निषेधार्य आणि निंदनीय आहे, राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला कडक शिक्षा देण्याबाबत कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.
अकोला येथे एका गुंडाने चौदा वर्षीय मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी असा पाठपुरावा महिला आयोगाच्या वतीने करण्यात येत आहे, जेणेकरून अशा प्रवृत्तींवर वचक राहील आणि अशा पद्धतीच्या घटना घडविण्यात यासाठी काळजी घेतली जाईल, असेही त्या म्हणाल्या. या घटनेची माहिती मिळाल्यापासून संबंधित क्षेत्रातील पोलीस अधिका-यांच्या संपर्कात आहे. अशा घटना घडू नयेत याकडे लक्ष द्यावे लागेल, त्यासाठी समाजातील सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. बीट मार्शल, दामिनी पथक, आयोगाच्या विविध समित्या, हिरकणी कक्ष या माध्यमातून राज्याच्या विविध भागात समस्या सोडवण्याचे प्रयत्न केला आहे. अकोला येथे लवकरच भेट देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, याच घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आणि पुन्हा एकदा गृहमंत्री अपयशी ठरले म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, यासाठी सरकार आणि प्रशासनाला केवळ दोष देऊन उपयोग नाही. अशा घटना घडल्यानंतर त्याचा निकाल लवकरात लवकर लागावा, आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी फास्ट-ट्रॅक कोर्ट तयार करावे लागते. आयोगाची हीच भूमिका आहे की, आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, लवकरात लवकर ही प्रक्रिया व्हावी मात्र कुणीतरी सांगितले म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट चालत नाही, फास्ट ट्रॅक कोर्ट ही एक प्रक्रिया आहे. असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

Back to top button