पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणावरून राज्यभरात वातावरण तापले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरून संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. यात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेत भुजबळ यांच्याबद्दल मोठा खुलासा करणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान दमानिया यांना भुजबळ यांच्या घरासमोर पोहोचण्याआधीच ताब्यात घेऊन जुहू पोलीस ठाण्यात नेले. Anjali Damania
जालना येथे ओबीसी एल्गार सभेत बोलताना भुजबळ यांनी मी कोणाच्या कष्टाचे खात नाही, तर स्वत:च्या कष्टाचे खातो, असे भुजबळ यांनी म्हटले होते. यावर उत्तर देताना दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत भुजबळ यांच्याविषयी त्यांच्या घरासमोर जाऊन एक मोठा खुलासा करणार असल्याचे म्हटले होते.
त्यात त्यांनी म्हटले होते की, आज भुजबळांचे भाषण ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली. कुणाच्या कष्टाचे खात आहेत भुजबळ ? असा सवाल करत त्यांच्या घरासमोर येऊन खुलासा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याआधीच सांताक्रुज पोलिसांनी भुजबळ यांच्या घरासमोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच दमानिया भुजबळांच्या घरासमोर पोहोचण्याआधीच त्यांना ताब्यात घेऊन जुहू पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
हेही वाचा