

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पाच दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालय मंगळवारी सुरु झाले असताना मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. त्यांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगलेल्या आहेत.
इतर मंत्र्यांच्या तुलनेने मंत्रालयात अधिक दिवस हजर राहणारे अजित पवार मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्या गटाच्या सर्व मंत्र्यांनी बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.
मंत्रालयात दुपारी १२ वाजता मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पावणे बाराच्या सुमारास सर्वच मंत्री बैठकीला आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बैठकीला आले होते. मात्र, अजित पवार दिसत नसल्यामुळे उपस्थित मंत्र्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. एखाद्या कार्यक्रमाला अजित पवार उशिराने जातात. त्यानुसार आजही ते उशिरा येतील, असा शिंदे गट आणि भाजपाच्या मंत्र्यांनी अंदाज बांधला होता. बैठक सुरु झाली तरीही अजित पवार आले नाहीत. यामुळे एखाद्या विषयावरून ते नाराज तर नाही ना, अशी कुजबुज सुरु झाली. शेवटी सात विषयांवर बैठक आटोपती घेण्यात आली.
सत्ताधारी पक्षाकडून उपमुख्यमंत्री पवार यांची तब्येत ठीक नसल्याची वावडी उडविण्यात आली. परंतु, देवगिरीवर ते नियोजित कार्यक्रमानुसार पक्षाचे नेते आणि इतर व्यक्तींना भेटत होते.