मुंबई : बाप्पाला भावपूर्ण निरोप! विसर्जन स्थळी उसळला लाखो भक्तांचा महासागर | पुढारी

मुंबई : बाप्पाला भावपूर्ण निरोप! विसर्जन स्थळी उसळला लाखो भक्तांचा महासागर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असे आमंत्रण देत, लाखो मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी भावपूर्ण निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटीसह जुहू व विविध विसर्जन स्थळी लाखो भक्तांचा महासागर लोटला होता. तर रस्तेही भक्तांनी फुलून गेले होते. सकाळी 8 वाजल्यापासूनच लालबागच्या राजासह मुंबईचा राजा व सार्वजनिक गणपती बाप्पा विसर्जनासाठी रवाना झाले.

मुंबई शहर व उपनगरात सकाळपासूनच जल्लोषाचे वातावरण होते. मुंबईसह आजूबाजूच्या भागातून आलेल्या भक्तांनी लालबागच्या राजासह विसर्जन स्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांसह गिरगाव, जुहू, दादर, गोराई आदी चौपाटी व अन्य विसर्जन स्थळी लाखो भक्तांचा अक्षरशः महासागर लोटला होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. असा जयघोष करत, वाद्यांच्या गजरामध्ये रस्त्यांवरून निघालेल्या मिरवणुका, गणरायावर ठिकठिकाणी रस्त्यावर होणारी पुष्पवृष्टी त्यामुळे संपूर्ण मुंबई शहर भक्तिमय होऊन गेले होते. ठीक ठिकाणी उभारलेल्या नियंत्रण कक्षाद्वारे भक्तांना विविध सूचना करण्यात येत होत्या. तर पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 3 हजार 300 बाप्पांचे विसर्जन पार पडले. सायंकाळी 5 वाजल्यानंतर चौपाट्यांवर सार्वजनिक गणेश मुर्त्या दाखल होऊ लागल्या. रात्री नऊ वाजेपर्यंत सुमारे 7 हजारापेक्षा जास्त बाप्पांचे विसर्जन झाले. दुपारी 2 वाजता अचानक जोरदार वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गणेश विसर्जनात व्यत्यय येत होता. परंतु भक्तांनी भिजत भिजतच आपल्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान लालबागच्या राजासह काही उंच मुर्त्यांचे शुक्रवार सकाळपर्यंत विसर्जन सुरू राहणार आहे.

गिरगाव चौपाटीवर देशी विदेशी पाहुण्यांची हजेरी

गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेने उभारलेल्या स्वागत कक्षात देशी-विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री, विविध देशांचे राजदूत यावेळी उपस्थित होते.

Back to top button