विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार यांचे नाव आघाडीवर | Opposition Leader Of Legislative Assembly | पुढारी

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार यांचे नाव आघाडीवर | Opposition Leader Of Legislative Assembly

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा सांगितला होता. या मुद्द्यावर काँग्रेसच्या मंगळवारी (दि. ११) झालेल्या मॅरेथॉन बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांचे नाव आघाडीवर आहे.
अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह वेगळी वाट धरल्याने विरोधी गोटात काँग्रेसच्या आमदारांची संख्या सर्वात जास्त झाली आहे. पवार यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता तर त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी काँग्रेसच्या मागणीत काहीही गैर नसल्याचे सांगितले होते. दरम्यान विधानसभेसोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरही काँग्रेसचा दावा मजबूत होण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे वरिष्ठ सदनातील शिवसेनेच्या आमदारांची कमी होत असलेली संख्या हे होय. अलीकडेच मनीषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला होता. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

राहुल गांधी सप्टेंबरमध्ये करणार दौरा

‘भारत जोडो’ मोहिमेच्या धर्तीवर येत्या नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये प्रत्येक जिल्ह्यात बसयात्रा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तत्पूर्वी सप्टेंबर महिन्यात राहुल गांधी हे राज्याचा दौरा करून जाहीर सभा घेणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी यांच्याही या दरम्यान जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत.

लोकसभेच्या किमान 20 जागा जिंकण्याचे लक्ष्य

नेत्यांनी आपसांतील मतभेद विसरुन कामाला लागावे आणि लोकसभेच्या किमान 20 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, असे निर्देश खर्गे यांनी बैठकीत दिले. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीप्रमाणे काँग्रेसमध्ये फूट पडू नये, यासाठी राज्यातील नेत्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. पक्षाने महाराष्ट्रापासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येकाने गट – तट विसरून काँग्रेस पक्षाला मजबूत केले पाहिजे. भारत जोडो यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी सांगितले. ज्येष्ठ नेत्यांना ठराविक लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी वाटून देण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे.

Back to top button