Mobile Hack : धारावीतील तरुणाचा मोबाईल हॅक; ‘गुगल पे’ मधून हजारो रुपये गायब | पुढारी

Mobile Hack : धारावीतील तरुणाचा मोबाईल हॅक; 'गुगल पे' मधून हजारो रुपये गायब

धारावी : पुढारी वृत्तसेवा : धारावी शिवशक्तीनगर येथील तरुणाचा मोबाईल हॅक करून पैसे चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेश बोराडे असे या तरुणाचे नाव आहे. (Mobile Hack)

११ जून रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास राजेशच्या गुगल पे वरून अज्ञात भामट्याने त्याच्या बँक खात्यामधील १० हजार १६० रुपये काढून घेतल्याची घटना घडली. सुदैवाने वेळीच त्याने बँकेत धाव घेऊन आपल्या बँक खात्यामधील ७ लाख रुपये काढून फिक्स डिपॉझिट केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी राजेश बोराडे याने अभ्युदय बँक व धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे अभ्युदय को ऑप बँकच्या धारावी शाखेतील खात्यामध्ये ७ लाख १० हजार रक्कम ठेवलेली होती. मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून तो गरजेनुसार गुगल पे सुरु करून ऑनलाईन व्यवहार करत होता. ११ जून रोजी मध्यरात्री साडे तीन च्या सुमारास त्याचा मोबाईल अज्ञाताने हॅक केला. या घटनेतील बँक खात्यावर झालेल्या व्यवहारानुसार शादाब सोहराब खान नावाच्या खात्यावर १६० रुपये ट्रान्स्फर करण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच १० हजार रुपये पद्मा नरसप्पा चिंताकेंदी यांच्या नावावर ट्रान्स्फर करून काढून घेण्यात आले. १२ जून रोजी सकाळी हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच राजेश याने अभ्युदय बँकेत धाव घेऊन पैसे खात्यातून गायब झाल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Back to top button